आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कल्याण हत्याकांडाला वळण; \'आई-वडिलांची हत्या करून मुलाने आत्महत्या केली\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईतील कल्याण परिसरात एकाच कुटुंबातील तिघांची हत्या प्रकरणाला आता वेगळेच वळण मिळाले आहे. ज्ञानेश्वर वानखेडे नावाच्या 29 वर्षीय मुलाने आई-वडिलांची हत्या करून आत्महत्या केल्याचे पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे. तसेच संबंधित कुटुंबातील अर्धा किलो सोने चोरीला गेले नसल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. रविवारी या तिघांचे मृतदेह घरात आढळून आले होते. हे हत्याकांड चोरी व लुटीतून झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली होती. तसेच घरातील अर्धा किलो सोने लुटून नेल्याचे सांगितले गेले होते. मात्र, घरात कोणतेही चोरी झाली नसल्याचे पुढे आले आहे.
वडील सुभाष वानखेडे (67) व आई प्रमोदिनी वानखेडे (56) यांची 29 वर्षीय मुलगा ज्ञानेश्वर वानखेडे याने हत्या केली असावी, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. नातेवाईकांच्या बोलण्यात विसंगती आढळत आहे. कल्याण-आग्रा रोडजवळील गणपती चौकातील मयुरेश बिल्डिंगमधील, चौथ्या मजल्यावर राहणाऱ्या वानखेडे कुटूंब राहत होते. सुभाष वानखेडे आणि प्रमोदिनी यांचे मृतदेह हातपाय बांधलेल्या स्थितीत आढळून आले होते. तर, मुलगा ज्ञानेश्वरच्या तोंडाला पिशवी बांधून तोंडात कार्बनडाय ऑक्साईड गॅस सिलेंडरचा पाईप टाकण्यात आला होता. त्यामुळे त्याचा गुदमरून मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र, आता या हत्याकांडाचा उलगडा होऊ लागला आहे.
दस-यासारख्या सणांच्या दिवशी कल्याणमधील या हत्याकांडानं परिसरात खळबळ उडाली होती. पोलिसांनी प्राथमिक तपासात ही लुट व चोरीची घटना असावी, असे म्हटले होते तरीही पोलिस दुस-या कोणत्या कारणाने हत्याकांड तर घडले नाही याची चाचपणी करीत होते. आता पोलिसांना काही ठोस माहिती हाती लागली आहे. दरम्यान, कल्याण पोलिस ठाण्याच्या क्राईम ब्रान्चने तपास सुरू केला आहे व या घटनेचा संपूर्णक्रम समजल्याशिवाय काहीही बोलणार नसल्याचे सांगण्यात येते.