मुंबई- अपंग मुलाला घेऊन प्रसिद्ध हाजी अली दर्ग्यावर चादर चढवण्यासाठी आलेल्या पाकिस्तानी कुटुंबाला मुंबईतील हॉटेल चालकांनी रूम देण्यास नकार दिला. सरकारी चौकशीचा ससेमिरा नको म्हणून, त्यांना आश्रय देण्यास टाळाटाळ करण्यात आली. त्यामुळे या कुटुंबाला रात्र अक्षरश: फुटपाथवर काढावी लागली. अखेर पोलिसच त्यांच्या मदतीला धावून आले.
चार ऑक्टोबर रोजी एक पाकिस्तानी कुटुंब ४० दिवसांच्या व्हिसावर पर्यटनासाठी भारतात दाखल झाले आहे. या कुटुंबातील चाैघे जण बुधवारी जोधपूर येथून मुंबईत आले. आपल्या विकलांग मुलासह त्यांनी हाजी अलीचे दर्शन घेतले. त्यानंतर मुक्कामासाठी त्यांनी अनेक हॉटेलचे उंबरठे झिजवले. मात्र, अनेकांनी त्यांना ‘सी फॉर्म’ नसल्याचे कारण देत रूम भाड्याने देण्यास नकार दिला. त्यामुळे निराश होऊन हे कुटुंब सीएसटी स्थानकावर परतले. या वेळी रेल्वेचे पोलिस उपनिरीक्षक महेश चव्हाण यांनी त्यांची चौकशी केली तेव्हा हा प्रकार उजेडात अाला. चव्हाण यांनी त्यांच्याकडील कागदपत्रांची पाहणी केली व जवळच्या पोलिस ठाण्यात नेऊन त्यांच्या चहा- नाष्ट्याची सोय केली. त्यानंतर हे कुटुंब रात्रभर पदपथावर झोपले. झालेल्या प्रकाराने निराश होऊन हे कुटुंब मुंबईतून १८ तारखेचे आपले परतीचे तिकीट रद्द करून लोकशक्ती एक्स्प्रेसने तातडीने पुन्हा जोधपूरला परत गेले.
सी फॉर्म आहे तरी काय? विदेशातून भारतात आलेल्या नागरिकांना कोणत्याही हॉटेलमध्ये थांबण्यापूर्वी सी फॉर्म भरावा लाग्तो. या फॉर्मवरील माहिती संबंधित हॉटेलचालकाला सरकारी यंत्रणेकडे द्यावी लागते. यावरुन शहरात आलेली विदेशी कुटुंबाचा कुठे व किती दिवस निवास होता याची माहिती सरकारी यंत्रणांना मिळते. मात्र, ही कटकटच नको म्हणून आता बहूतांश हॉटेलचालक पाकिस्तानी नागरिकांना ‘सी फॉर्म’ नसल्याचे कारण देत रुम भाड्याने देण्यास टाळाटाळ करतात.