आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mumbai's New Police Commissioner Rakesh Maria Speaks About His Plans News In Marathi

‘तक्रारदार राजा’ आता प्रत्येक ठाण्यात लागणार फलक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - नागरिकांना पोलिस यंत्रणा अधिकाधिक जवळची वाटावी, पोलिसांची प्रतिमा सुधारावी यासाठी नवीन पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांनी प्रत्येक पोलिस ठाण्यात तक्रारकर्त्यांचे आभार मानणारे खास फलक लावण्याच्या सूचना केल्या आहेत. या फलकावर तक्रारकर्त्यांचे आभार मानणारा मजकूर असेल.

या फलकावरील संदेशाच्या माध्यमातून पोलिसांना त्यांच्या मूळ कर्तव्याची आठवण राहावी, हा उद्देश असल्याचे पोलिस उपायुक्त व प्रवक्ते महेश पाटील यांनी सांगितले. ठाण्यात येणारी पीडित व्यक्ती ही अत्यंत महत्त्वाची असल्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्याकडे पाहावे असे निर्देश आयुक्तांनी दिल्याचे पाटील म्हणाले. मुंबईतील सर्व 92 पोलिस ठाण्यांमध्ये मराठी व इंग्रजी भाषेतील फलक लावण्याच्या सूचना त्यांनी दिली आहे. या उपक्रमाचा उद्देश केवळ तक्रार करणार्‍याला चांगली वागणूक देणे हा नसून, पोलिसांची प्रतिमा सुधारण्याचा हा प्रयत्न असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी सांगितले.

आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर मारिया यांनी पोलिस अधिकार्‍यांबरोबर झालेल्या काही मॅरेथॉन बैठकांनंतर त्यांनी महिला, ज्येष्ठ नागरिक यांच्या सुरक्षिततेसंदर्भात काही महत्त्वाच्या सूचना केल्या. तसेच रस्त्यावर घडणारे गुन्हे, अंमली पदार्थाचा पुरवठा यावर कारवाईचे निर्देशही दिले होते.

काय असेल संदेश?
तक्रार करणारी व्यक्ती ही आमच्या ठाण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. ती आमच्या कामातील अडथळा नसून, आमच्या कामाचा उद्देश आहे. आमच्या ठाण्यासाठी ही बाहेरची व्यक्ती नसून, आमच्या ठाण्याचाच एक भाग आहे. त्यांना सेवा देऊन आम्ही उपकार करत नाही. उलट तेच आम्हाला सेवेची संधी देत आहेत.