आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Munde Will Lead Campaign For Maharashtra Assembly Election

विधानसभा मुंडे यांच्याच नेतृत्वाखाली लढणार, भाजप नेते विनोद तावडेंचे स्पष्टीकरण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्यात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुका केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखालीच लढल्या गेल्या. आगामी विधानसभा निवडणुकीतही त्यांचेच मार्गदर्शन घेऊन भाजप महायुतीसह निवडणूक लढवील. लोकसभा निवडणुकीआधी पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसारच हा निर्णय घेण्यात आला होता. त्या काहीएक बदल होणार नाही, अशी माहिती विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी दिली.
भाजप कार्यालयात पत्रकारांशी बोलताना तावडे म्हणाले, महायुतीचा मुख्यमंत्री कोण, अशी चर्चा आहे. पण, सध्याच आम्हाला हा प्रश्न महत्वाचा वाटत नाही. महायुतीच्या बैठकीत यावर निर्णय होईल. शिवसेना व भाजपला प्रत्येकी अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद वगैरेची चर्चा असली तरी आमचे लक्ष्य विधानसभा जिंकणे आहे.

सिंचन क्षेत्र वाढवण्याची मागणी : मराठवाडा, विदर्भ, कोकणातील सिंचनाची विदारक स्थिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन सांगितली आहे. सिंचनाअभावी विकास खुंटल्याचे निदर्शनास आणून दिले. पंतप्रधान सिंचन योजनेची सुरुवात या भागापासून करण्याची मागणी पंतप्रधानांकडे केल्याचेही तावडे यांनी पत्रकारांना सांगितले.

कणगरा प्रकरणाची न्यायालयीन चौकशी हवी
उस्मानाबाद जिल्हय़ातील कनगरा येथे निदरेष ग्रामस्थांना पोलिसांकडून मारहाण झाली. पोलिस रक्षक नसून भक्षक झाले आहेत. गृहमंत्री आर.आर.पाटील यांचा पोलिसांवर वचक राहिला नाही. प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी, अन्यथा अधिवेशनात सरकारला धारेवर धरू, असा इशाराही तावडे यांनी दिला. तावडे यांनी दोन दिवसांपूर्वी कनगरा गावाला भेट देऊन तेथील ग्रामस्थांची भेट घेतली होती.