आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेच्या तिजोऱ्या मालामाल; सव्वाशे कोटींहून अधिक कर जमा, महापाैरांनीही भरली ३ वर्षांची थकबाकी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आैरंगाबाद/ मुंबई - पाचशे व एक हजाराच्या बंद करण्यात आलेल्या नोटा जिरवण्यासाठी सामान्य नागरिकांनी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. सर्वच बँकांनी चलन बदलून घेण्यासाठी डिसेंबरअखेरपर्यंतची मुदत दिली असली तरी तोपर्यंत दम काढण्याची कोणाचीच तयारी नाही. लवकरात लवकर आपल्याकडील नोटा कशा ‘खपवता’ येतील यासाठी जो तो आग्रही असल्याचे दिसतो. यातूनच गेल्या अनेक वर्षांपासून खडखडाट असलेल्या राज्यातील बहुतांश महापालिकांच्या तिजोऱ्या शुक्रवारी एकाच दिवशी मालामाल झाल्या. रात्री बारापर्यंत पैसे स्वीकारण्याची मुदत असल्यामुळे लोकही तितक्याच आग्रहाने पैसे भरण्यासाठी गर्दी करत होते. सर्व पालिकात सुमारे सव्वाशे कोटींहून अधिक रक्कम जमा झाली.

राज्यातील सर्वच पालिकांत शुक्रवारी दुपारी चार वाजेपर्यंत विविध करांपोटी ८२ कोटी १३ लाख रुपयांचा भरणा करण्यात आला होता. मध्यरात्रीपर्यंत ही रक्कम १२० कोटींहून अधिक जाईल, असा विश्वास नगरविकास खात्याच्या सचिव मनीषा म्हैसकर-पाटणकर यांनी व्यक्त केला. दरम्यान, हा कर भरण्यासाठी १४ नाेव्हेंबरपर्यंत मुदत वाढवण्यात आली.

वर्षानुवर्षे कोट्यवधी रुपयांची करांची थकबाकी असल्यामुळे बहुतांश नगरपालिका व महापालिकांच्या तिजोऱ्यांत खडखडाट असतो. मार्चअखेरीस पालिका प्रशासन वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवून थकबाकी वसूल करण्यासाठी प्रयत्न करते. मात्र त्याला फारसा प्रतिसाद मिळत नाही. सर्वसामान्य नागरिकच नव्हे तर धनाढ्य व्यक्तींकडेही कोट्यवधी रुपयांची कर थकबाकी असते. मुख्य स्रोत असलेला हा कररूपी पैसाच मिळत नसल्याने शहराच्या विकासकामांवर त्याचा परिणाम होतो. मात्र, माेठ्या नोटा बंदीच्या निर्णयाने महापालिकांची दैनाच फिटली. पालिकांनी कर स्वरूपात जुन्या नोटा स्वीकाराव्यात, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी काढले आणि २४ तासांतच लोकांनी रांगा लावून महापालिकेची तिजोरी भरली. साेलापूरच्या महापाैर सुशीला आबुटे यांनी तीन वर्षांपासून थकीत असलेला एक लाख १५ हजार रुपये कर भरून टाकला.
बातम्या आणखी आहेत...