आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विरारमध्ये तांदूळ व्यापा-याची हत्या, 30 लाखांची रोकड केली लंपास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- विरारमध्ये काल रात्री चंदनसार तांदूळ मार्केटमध्ये अज्ञात चोरट्यांनी केलेल्या गोळीबारात तांदूळाचे व्यापारी रमण शहा (वय 52) यांचा मृत्यू झाला. शहा काल रात्री आपले दुकान बंद करून जात असताना त्यांच्यावर हा हल्ला झाला. शहा यांच्याकडे त्यावेळी दिवसभरात आलेली 30 लाख रूपयांची रोकड होती.
चंदनसार तांदूळ मार्केटमधील आपले दुकान बंद करून रोकड असलेली बॅग घेऊन जात असताना कोणीतरी अज्ञाताने त्यांच्यावर पाळत ठेऊन गोळीबार केल्याची शक्यता वर्तविली जात आहे. शहा यांना विरारमधील संजीवनी रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
याबाबतची माहिती अशी की, रमण शहा यांचे चंदनसार तांदूळ मार्केटमध्ये दुकान आहे. ते तांदळाचे होलसेल व्यापारी होते. तसेच ते तांदूळ महोत्सव भरवायचे. त्यामुळे त्यांचा रोजचा व्यवसाय मोठा होता. रविवारी रात्री नेहमीप्रमाणे दुकान बंद करून 30 लाख रुपयांची रोकड असलेली बॅग घेऊन ते घरी निघाले होते. हातातील बॅग त्यांच्या गाडीच्या डिकीत ठेवत असतानाच दबा धरून बसलेल्या पल्सर गाडीवरील दोन अज्ञात इसमांनी त्यांच्यावर तीन राउंड फायर केले. त्यातील एक गोळी शहा यांच्या छातीत घुसली. त्यामुळे ते लागलीच जमिनीवर कोसळले.
गोळीबार झाल्यानंतर तांदूळ मार्केटमध्ये एकच गोंधळ उडाला. याच गोंधळाचा फायदा घेत हल्लेखोर 30 लाखांची बॅगीसह लागलीच पसार झाले. शहा यांना त्यांच्या मदतनीसाने व इतरांनी तत्काळ विरारच्या संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ते चोरटे पल्सर गाडी घेऊन महामार्गाकडे फरार झाले.