आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई : मुस्लिम संघटनांचा \'सामना\'वर मोर्चा; प्रभादेवी परिसरात तणाव, कडेकोट बंदोबस्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना' या वृत्तपत्रात संपादक व खासदार संजय राऊत यांनी 'मुस्लिमांचा मताधिकार काढा' या वादग्रस्त लिहलेल्या लेख प्रकरणी मुस्लिम संघटना आक्रमक झाल्या आहेत. शिवसेनेने सामनाच्या माध्यमातून लोकशाहीचा खून केला असल्याचे सांगत मुस्लिम संघटनांनी दैनिक सामनाच्या कार्यालयावर मोर्चा काढला आहे. त्यामुळे सामना कार्यालय असणा-या प्रभादेवी भागात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. प्रभादेवी, भायखळा परिसरात शिवसैनिकांनीही गर्दी केली आहे.
दरम्यान, परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून मुंबई पोलिसांनी सामना कार्यालयाबाहेर कडक बंदोबस्त तैनात केला आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी मुस्लिम संघटनांच्या आंदोलकांना भायखळ्याजवळ अडवले आहे.
काय म्हटले होते संजय राऊतांनी आपल्या लेखात, वाचा...
संजय यांनी आपल्या लेखात म्हटले होते की, मुसलमानी ‘व्होट बँक’ हा आता चिंतेचा तितकाच डोकेदुखीचा विषय बनला. मुसलमानांचे दु:ख, दैन्य, अज्ञानाच्या नावाखाली प्रत्येक जण या ‘व्होट बँके’चेच राजकारण करीत असतो. कधीकाळी मुसलमानी मते ही कॉंग्रेसची मक्तेदारी होती. ही मक्तेदारी संपली. त्यामुळे आपल्याविरोधात ‘मुसलमानी’ मते खाणारा उमेदवार उभा राहू नये यासाठी ‘सेक्युलर’ म्हणवून घेणारा प्रत्येक उमेदवार शर्थ करीत असतो व त्यासाठी तो सौदेबाजी करतो. निवडणुकीच्या रिंगणात कुणाला ‘मुसलमानी मते’ खाणारा उमेदवार हवा असतो तर कुणाला नको असतो. मुसलमानी लोकसंख्येचे हेच महत्त्व राजकारणात उरणार असेल तर त्यांचा विकास कधीच होणार नाही. जोपर्यंत मुसलमानी मतांचे फक्त राजकारण होत राहील तोपर्यंत या देशातील मुसलमानांना भवितव्य नाही. म्हणूनच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ‘‘व्होट बँकेची अशी सौदेबाजी रोखायची असेल तर मुसलमानांचा मताधिकार काढा’’ अशी मागणी केली होती आणि ते खरेच होते. ज्या दिवशी मुसलमानांचा मताधिकार काढला जाईल त्यावेळी सर्व सेक्युलरवाद्यांचे मुखवटे गळून पडतील. मुसलमानांच्या दैन्यावस्थेविषयी किती ‘ओवेसीं’ना पुळका येतोय ते दिसेल आणि यासाठी आता मुसलमानांनीच पुढाकार घेतला पाहिजे. हा निर्णय राजकीय नसून राष्ट्रीय असायला हवा. मुसलमानांची व्होट बँक म्हणजे वारूळ आहे. वारुळातील मुंग्या बाहेर पडल्या तरी तेथे सर्पांची पिल्ले वाढतच असतात. मतांसाठी वारुळात हात घालणार्‍यांनी सावधान राहावे! त्यात देशहित नाही!