आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'झाकीर नाईकचे मनसुबे घातक, चिथावणीखाेर वक्तव्यांना बळी पडू नये'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- चिथावणीखोर वक्तव्ये करून धार्मिक भावना भडकावल्याबद्दल राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि मुंबई पोलिसांच्या रडारवर असलेल्या डॉ. झाकीर नाईकच्या विरोधात आता मुंबईतील सुधारणावादी मुस्लिम संघटना आणि सामाजिक संस्था पुढे सरसावल्या आहेत. धार्मिक फूट पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या नाईकच्या घातक मनसुब्यांना बळी पडू नका, असे आवाहन करत या संघटनांच्या वतीने नाईकविरोधात कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
सामाजिक कार्यकर्ते जावेद आनंद, फिरोज मिठीबोरवाला, नूरजहाँ नियाझ यांच्यासह अनेक सुधारणावादी मुस्लिम संघटनांच्या वतीने घेतलेल्या पत्रकार परिषदेत झाकीरविरोधाचा सूर उमटला. या वेळी नाईकच्या धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या दहा भाषणांच्या चित्रफितीही दाखवण्यात आल्या. इस्लाममधील अनेक मुद्द्यांचा गैरअर्थ लावत आणि शब्दांचे खेळ करत झाकीर नाईक मुस्लिम तरुणांची माथी भडकावण्याचे काम करत आहेत. आपल्या अनेक भाषणांत नाईक मुस्लिम महिलांबद्दलही अनुदार काढत असतो. पीस टीव्हीच्या माध्यमातून नाईक जी भाषणे प्रसारित करतो त्यात इस्लाम धर्माचा त्याग करणाऱ्यांना मृत्युदंड द्यावा, अशी शिकवण तो देतो. त्यामुळे नाईकच्याविरोधात एकवटण्याचे आवाहन मुस्लिम संघटनांनी केले आहे. तसेच झाकीर नाईकच नव्हे, तर सर्वच धर्मांतील चिथावणीखोर वक्तव्ये करून धार्मिक भावना भडकवणाऱ्यांच्या विरोधात सखोल चौकशी करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही या संघटनांच्या वतीने करण्यात आली.
झाकीर नाईक करणार आरोपांचा खुलासा
आपल्यावर होत असलेल्या आरोपांच्या खुलाशासाठी डॉ. झाकीर नाईक थेट अाफ्रिकेतून स्काइपच्या माध्यमातून पत्रकार परिषदेत हजेरी लावणार आहे. नाईक आपल्या कुटुंबासह सोमवारी सौदी अरेबियाहून मुंबईत परतणार होता. मात्र, अटकेच्या भीतीने भारतात परतण्याचा निर्णय रद्द करत अाफ्रिकेतील काही देशांच्या दौऱ्यावर जाण्याचा निर्णय त्याने घेतला. आपल्याविरोधात होत असलेल्या वातावरणामुळे कमालीचा चिंतित झालेल्या नाईकने आरोपांचा खुलासा करण्याचे ठरवले असून त्याच्या संस्थेमार्फत या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
बातम्या आणखी आहेत...