मुंबई - मुस्लिमधर्मीय
आपल्या मतांचे विभाजन होऊ न देण्याबाबत नेहमीच दक्ष असतो. मात्र, राज्यातील राजकीय समीकरणात या वेळी मोठा बदल झाला असल्याने मुस्लिम मते एकगठ्ठा कोणत्याच पक्षाला मिळणार नाहीत, असे चित्र आहे. विविध पक्षांबद्दल असलेली आपुलकी आणि भाषेच्या आधारावरही राज्यातील मुस्लिम मते वेगवेगळ्या पक्षांमध्ये विभागली जातील असा अंदाज आहे. मतदारसंघनिहाय विजयी होणा-या धर्मनिरपेक्षवादी उमेदवाराच्या पारड्यातच मुस्लिम समाज मते टाकेल, अशी आशा मात्र राजकारणी व मुस्लिम धर्मगुरूंना वाटत आहे.
२००१ च्या जनगणनेनुसार राज्यात ९६.७ दशलक्ष इतकी मुस्लिमधर्मीय लोकसंख्या आहे. मुस्लिम मतदार हिंदुत्ववादी पक्षाच्या नेहमीच विरोधात जातो. त्यामुळे मुस्लिम मते एकगठ्ठा काँग्रेसच्या पारड्यात पडत होती. या वेळी एमआयएम हा तेलंगणातील मुस्लिम नेतृत्वाचा पक्ष राज्यातील विधानसभा निवडणुकीत उतरला आहे. शिवसेना पहिल्यांदाच भाजपशी फारकत घेत निवडणुका लढवत आहे तर काँग्रेसने निवडणुकीपूर्वी मुस्लिम आरक्षणाचा निर्णय घेतलाय. त्यामुळे समाजवादी, काँग्रेस आणि एमआयएम असे राज्यातील मुस्लिम मतांचे त्रिभाजन होण्याचा दाट शक्यता आहे.
राज्यातील जातीय समीकरणे बदलल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सर्व १३ मुस्लिम उमेदवार डेंजर झोनमध्ये आहेत. सपाला २००९ मध्ये मिळालेल्या चार जागा टिकवता टिकवता नाकी नऊ येत आहेत. तर तेलंगणाचा एमआयएम राज्यात या वेळी खाते उघडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मराठी मुस्लिमांचा पाठिंबा प्राधान्याने काँग्रेस, राष्ट्रवादी यांना, उत्तरेतील मुस्लिमांचा पाठिंबा समाजवादीला, तर दक्षिणेतील मुस्लिमांचा पाठिंबा एमआयएमला दिसत आहे.
एमआयएमचे २६ उमेदवार
तेलंगणामधील एमआयएम या पक्षाने राज्यात २६ मतदारसंघांत उमेदवार दिले आहेत. त्यातील १६ उमेदवार मुंबई-ठाण्यात आहेत. एमआयएम नेते अकबरुद्दीन ओवेसी महिन्यापासून मुंबईत तळ ठोकून आहेत. दक्षिण भारतीय मुस्लिम आणि मराठवाड्याच्या सीमाभागातील मुस्लिम एमआयएमचे पाठीराखे आहेत. एमआयएम निवडणुकीत उतरल्याने समाजवादी पक्षाचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
सपाच्या पाठीशी उत्तर भारतीय
भिवंडी, मुंबईत समाजवादी पक्षाला चांगला जनाधार आहे. या पक्षाचे राज्यातील सर्वेसर्वा अबू आझमी हे मूळचे उत्तर प्रदेशातील आहेत. मुलायमसिंह यांना मानणारा उत्तर भारतीय मुस्लिम मतदार एमआयएमच्या पाठीशी आहे. समाजवादी पक्ष हा २१ जागा लढवत आहे. एकीकडे एमआयएमचे प्रस्थ वाढत असतानाच काँग्रेसने ऐनवेळी आघाडीस नकार दिल्याने समाजवादी पक्षाची मोठी अडचण झाली आहे.
सेनेला मराठी मुस्लिमांचे बळ
निवडणुकीच्या तोंडावर मनसे वाहतूक सेनेचे प्रमुख हाजी अराफत शेख शिवसेनेत दाखल झाले आहेत. शेख यांच्या वाहतूक सेनेचा मुंबईत मोठा दबदबा आहे. शेख मुस्लिम खाटीक समाजाचे नेतेही आहेत. सेनेने त्यांना उपनेते पद िदले आहे. माजी मंत्री साबीर शेख यांचे पुतणे असलेल्या शेख यांच्या मुस्लिम वस्त्यांत जोरदार सभा होत आहेत .
निधर्मी उमेदवारास मत!
समाजवादी, एमआयएम, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे चार पक्ष या निवडणुकीसाठी निधर्मी पक्ष आहेत. त्यामुळे मुंबईतील मुस्लिम समाजात संभ्रमावस्था आहे. परंतु वरीलपैकी निधर्मी पक्षाच्या जिंकणा-या उमेदवारास मुस्लिमांचा कल राहण्याची शक्यता आहे.'' मौलाना मोईनुउद्दीन अश्रफ, मुस्लिम समाजाचे धार्मिक नेते.