आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझी पदवी बनावट नाही, शिक्षणमंत्री विनोद तावडेंचा खुलासा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मी पुण्याच्या ज्ञानेश्वर विद्यापीठाचा विद्यार्थी आहे, याचा मला अभिमान आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रातही येथूनच पदवी घेतल्याचे स्पष्ट नमूद केले आहे. त्यामुळे मी कोणतीही खोटी माहिती वा कोणाचीही फसवणूक केलेली नाही, असे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सोमवारी स्पष्ट केले. एका वाहिनीने तावडेंची पदवी बनावट असल्याचे वृत्त दिले हाेते. त्यावर मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना तावडे म्हणाले, ‘अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी शिक्षण न मिळता प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळावा म्हणून ज्ञानेश्वर विद्यापीठ, पुणे येथील सप्रे व अन्य एका शिक्षकाने एक ब्रिज कोर्स सुरू केला होता. मी १९८० मध्ये त्याला प्रवेश घेतला. त्यात १९८४ ला मी उत्तीर्ण झालो.

या अभ्यासक्रमास शासनमान्यता नाही हे विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या वेळीच सांगण्यात आले होते, हे मला माहीत होते. काही जण या संदर्भात २००२ मध्ये न्यायालयात गेले. न्यायालयाने त्यावर बंदी आणली. त्यानंतर विद्यापीठाने तो अभ्यासक्रम बंद केला. त्याला शासनमान्यता नसल्याने मी कधीही पासपोर्टसाठी पदवीधारकांना असणारे लाभ घेतलेले नाहीत. तसेच मी स्वत:ची पदवीधर मतदारसंघात नोंदणीही केलेली नाही.

माझ्या शिक्षणाबाबतची प्रत्येक माहिती मी निवडणूक प्रतिज्ञापत्रात आहे तशी दिलेली आहे. त्यात मी कुठे शिकलो त्या संस्थांचा उल्लेखही स्पष्टपणे केला आहे. जर मी हा अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठ, पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ आदी विद्यापीठांतून केल्याचे नमूद केले असते, तर मात्र ती फसवणूक ठरली असती.’