आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रुग्णशय्येवर चिंता तहानलेल्या मराठवाड्याची

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गेल्याच आठवड्यात बायपास झाली, मणक्यातील गॅपमुळे बेडरेस्टची सक्त ताकीद आहे, एक किडनी काढण्यात आली, शुगर वाढल्यामुळे कडक पथ्याच्या सूचना..... पण अशा स्थितीतही मुंबईतील ‘एशियन हार्ट इन्स्टिट्यूट’मध्ये अंथरुणाला खिळून असलेले ८६ वयाचे भाई एन. डी. पाटील कृष्णा खोर्‍याचे मराठवाड्याच्या हक्काचे २१ टीएमसी पाणी मिळवण्यासाठी आंदोलनाची तयारी करत आहेत.

‘शेकाप’चे ज्येष्ठ नेते, ‘रयत’चे माजी अध्यक्ष भाई एन. डी. पाटील सध्या सक्रिय राजकारणापासून दूर आहेत. पण चळवळीत कार्यरत आहेत. राज्यात चालू असलेल्या जागतिकीकरणविरोधी लढ्यांचे एन. डी. मार्गदर्शक आणि खंबीर आधारस्तंभ आहेत. नुकतीच बायपास झाल्याने त्यांना कुणालाही भेटू दिले जात नाही. ‘मुंबईला येऊ नका,’ असे कोल्हापुरातून िनघताना त्यांनीच कार्यकर्त्यांना बजावलेही होते. तरी दुष्काळ निवारण मंडळाचे दोन ज्येष्ठ कार्यकर्ते
हॉस्पिटलमध्ये धडकतात आणि यंदाच्या दुष्काळाला तोंड देण्याच्या तयारीची चर्चाही सुरू होते.

‘१९५२ आणि १९७२ च्या दुष्काळाप्रमाणे यंदाची स्थिती असणार आहे. त्यामुळे विदर्भ, खान्देशपेक्षा मराठवाडा दुष्काळ निवारण समितीसमोर यंदा मोठे आव्हान आहे. आता आपल्याला मराठवाड्याच्या २७ टीएमसी पाण्यासाठीची लढाई आणखी तीव्र करायची आहे.’ त्याच्या तयारीच्या सूचना एन. डी. खणखणीत आणि स्पष्ट शब्दांत त्यांच्या नेहमीच्या सवयीने एकामागेमाग एक देत राहतात.

‘प्रा. एच. एम. देसरडा दुष्काळाला तोंड देण्याच्या उपाययोजनांचा नवा आराखडा बनवणार होते. बनवला का? डॉ. सुलभा ब्रह्मे दुष्काळाच्या पाहणींची प्रश्नावली तयार करणार होत्या. ती लागलीच औरंगाबादच्या डॉ. एस. बी. वऱ्हाडे यांच्याकडे पोहोचवा. रेणापूरच्या मुर्गाप्पा खुमसे आणि के. ई. हरदास यांना मराठवाड्यातील प्रत्येक कॉलेजातील िवद्यार्थ्यांकडून ती प्रश्नावली भरून घेण्यास सांगा’, अशा बारीकसारीक गोष्टींकडे एन. डी. कटाक्षाने लक्ष वेधतात.

इतक्यात एन. डी.च्या पत्नी ‘माई’ ज्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मोठ्या सख्ख्या भगिनी आहेत त्या येतात. कार्यकर्ते लगेच आपले बोलणे आवरते घेतात. ‘त्यांना धाप लागतेय, आता चर्चा थांबवा,’ असे सूचना माई करतात. कार्यकर्ते जाण्यासाठी निघतात. शेवटी एन. डी. म्हणतात, आता मी ठणठणीत आहे. चार-दोन दिवसांनी फिरायला लागेन. थोडा शुगरचा प्रॉब्लेम आहे. दहा तारखेला मी कोल्हापुरात आहे. बाकीच्या गोष्टी तिथं ठरवू. दोन दिवस राहण्याच्या बेतानं या. नीट जावा बाळांनो!

२७ टीएमसी पाणी मिळायलाच हवे
‘कृष्णा खोर्‍याचा १० टक्के भूभाग मराठवाड्यात आहे. त्यामुळे तुळजापूर, भूम, परंडा, कळंब, उस्मानाबाद या तालुक्यांना कृष्णा खोर्‍यातील २७ टीएमसी पाणी मिळायलाच हवे. पश्चिम महाराष्ट्रातले नेते बेरकी आहेत. मराठवाड्याचा मेळ लागू देणार नाहीत. दोन मुख्यमंत्री मराठवाड्याचे असताना त्यांना जमले नाही. आता तर सत्तेचा केंद्रबिंदू विदर्भात आहे. लक्षात ठेवा, समन्यायी पाणीवाटपाचे आपले जे लढे आहेत, त्यातील मराठवाड्याच्या पाच तालुक्यांच्या २७ टीएमसी पाण्याची लढाई बिनीची असेल. मार्चमध्ये तुळजापुरात पाणी परिषद घ्यायचीच आहे. त्याच्या तयारीला लागण्याचे एन. डी. लगेच सांगून ठेवतात.