मुंबई - वंशाच्या दिव्यासाठी वडील एका मुलीशी विवाह करण्याचा दबाव आणत असल्याचा आरोप ICC चे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचा समलैंगिक मुलगा अश्विनने केला आहे. अश्विन म्हणाला की, मी माझा पार्टनर अवि मुखर्जी याच्याबरोबर राहतो आणि त्याच्यासोबत राहण्याचीच माझी इच्छा आहे. पण माझे वडील वंश वाढवण्यासाठी मुलीशी विवाह करण्याचा दबाव आणत आहेत.
कैदेट ठेवल्याचाही आरोप
अश्विनने आरोप केला की, सध्या आम्हाला दोघांना त्यांनी चेन्नईच्या बोट क्लबच्या जवळ असलेल्या घरात कैद करून ठेवले आहे. 2012 मध्येही अश्विनने असे आरोप केले होते. वडिलांच्या सांगण्यावरून पोलिस त्रास देऊन अपमान करत असल्याचे अश्विन म्हणाला होता. आता अश्विनने वडिलोपार्जित संपत्तीमध्ये
आपल्या भागीदारीवर दावा केला आहे. आपल्या मनाप्रमाणे जीवन जगता यावे यासाठी संपत्तीवर दावा केल्याचे तो म्हणाला. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अश्विनने पुरावे म्हणून श्रीनिवासन म्हणजे त्याच्या वडिलांनी लिहिलेली काही पत्रेही दाखवली. अश्विनला त्याच्या वडिलांनी इंडिया सिमेंटच्या संचालकीय मंडळात सहभागी करून घेण्याची ऑफर दिली होती, असेही त्याने सांगितले.
पत्रांमधील मजकूर
अश्विनने दिलेल्या माहितीनुसार, श्रीनिवासन आणि त्यांची पत्नी यांचे अश्विनवर खूप प्रेम असून त्यांचा वारसा सांभाळावा असे एका पत्रात लिहिले आहे. अश्विनच्या मते त्यांची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी श्रीनिवासन त्याच्यावर दबाव आणत आहेत. अश्विन आणि त्याचे वडील श्रीनिवासन यांच्यात 2006 पासून हा वाद सुरू आहे. अश्विनने सार्वजनिकरित्या तो समलैंगिक असल्याचे जाहीर केले होते. तेव्हापासूनच तो कुटुंबापासून वेगळा राहतो. अश्विन श्रीनिवासन यांचा एकुलता एक मुलगा आहे. त्याची एक बहीण असून तिचा विवाह गुरुनाथ मयप्पन यांच्याशी झालेला आहे. मयप्पन यांना आयपीएल मॅच फिक्सिंग प्रकरणी आरोपी ठरवण्यात आले आहे.