आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाॅफलाइन उमेदवारी अर्ज भरण्याची मुभा; निवडणुकीसाठी ऑफलाइन अर्ज भरता येणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- नगर परिषद व नगर पंचायतींच्या चारपैकी पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज पारंपरिक पद्धतीने (ऑफलाइन) स्वीकारण्यास राज्य निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे. ही माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली. ते म्हणाले, या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज व शपथपत्रे सहज भरता यावीत यासाठी माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या मदतीने संगणक प्रणाली विकसित करण्यात आली आहे. २४ ऑक्टोबरपासून अर्ज भरण्याची कार्यवाही सुरू आहे; परंतु या प्रणालीबाबत काही तक्रारी आहेत. त्यामुळे उमेदवारांना २९ ऑक्टोबर २०१६ पर्यंत अर्ज व शपथपत्रे भरता यावीत म्हणून पारंपरिक पद्धतीने उमेदवारी अर्ज भरून घेण्यास परवानगी देण्यात आली आहे.
विखे पाटील यांचा पाठपुरावा
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी या आगामी निवडणुकीसाठी ऑफलाईन अर्ज भरून घ्यावेत, अशी मागणी लावून धरली होती. ही मागणी मान्य झाल्याने उमेदवारांसाठी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेतील मोठा अडथळा दूर झाला आहे. राज्यात नगर परिषद-नगर पंचायत निवडणूक जाहीर झाल्यानंतर आयोगाने उमेदवारी अर्ज ऑनलाईन भरून घेतले जातील, असे जाहीर केले होते. प्रत्यक्षात प्रक्रिया सुरू झाल्यानंतर उमेदवारांना मोठ्या प्रमाणात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल होऊ शकले नाहीत. विखे पाटील यांनी ही बाब राज्य निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून दिली होती. या संदर्भात राज्याचे निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांना सविस्तर पत्र लिहून ऑनलाइन पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अट शिथिल करावी, अशी मागणी त्यांनी केली होती. विखे पाटील यांनी निवडणूक आयुक्त सहारिया यांचे याबद्दल आभार मानले असून झालेल्या निर्णयामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेतील मोठा अडथळा दूर झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

या होत्या अडचणी...
तालुकास्तरावर वीज खंडित होण्याचे प्रकार, इंटरनेटची अपुरी सुविधा आणि अर्ज दाखल करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या वेबसाइटमध्ये सातत्याने येणारे अडथळे या ऑनलइन अर्ज भरण्यात प्रमुख अडचणी होत्या. यासाठी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी तीन दिवसांपासून आयोगाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.
बातम्या आणखी आहेत...