आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनाथ काश्मिरी मुलींच्या कल्याणासाठी लढतोय नगरचा तरुण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - दहशतवादाने घेरलेल्या, शिक्षणापासून वंचित राहिलेल्या आणि मुख्य म्हणजे भारतापासून तुटकपणाची भावना घेऊन जगत आलेल्या काश्मीरमधील स्त्री जीवन हे तसे उपेक्षितच. हे स्त्री जीवन अनाथ मुलींचे असेल तर चित्र विदारकच. हे चित्र बदलण्यासाठी एक मराठी, तोही मूळचा नगर जिल्ह्यातील तरुण जिवाची बाजी लावून लढतोय. त्याला ठार मारण्याचे अनेक प्रयत्नही झालेत. मात्र, या सर्वांवर मात करत अधिक कदम याने अनाथ मुलींसाठी काश्मिरात आश्रम उभा केला. त्यामुळे अनेक मुली आज स्वयंपूर्ण होण्याच्या वाटेवर आहेत.

काश्मीरमधील अनाथ मुलींसाठी आश्रम सुरू करण्याचा कदम यांनी विचार केला. यातून बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनच्या ‘बसेरा-ए- तबस्सुम’ची स्थापना झाली. अनंतनाग, बिरवा, कुपवाडा या जिल्ह्यांमध्ये त्यांनी आश्रम स्थापन केले. या आश्रमांत अकरा महिन्यांपासून २० वर्षांच्या मुलींपर्यंत जवळपास १७० मुली आहेत. या आश्रमातील बहुतांश मुली मुस्लिम समाजाच्या आहेत. शिक्षणाबरोबरच या मुलींना स्वत:च्या पायावर उभे राहण्यास मदत व्हावी म्हणून त्यांना शिवणकाम, भरतकाम, मेंदी, कोरल ड्रॉ, फोटोशॉप असे व्यवसायाभिमुख शिक्षण दिले जाते. तसेच सॅनिटरी नॅपकीन बनवण्याचेही प्रशिक्षण दिले जाते. यापैकी काही मुली नुकत्याच मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस या संस्थेला भेट देण्यासाठी आल्या होत्या. आपणही काही करून दाखवू शकतो, अशी जिद्द या मुलींमध्ये आहे. यातल्या तबस्सुमला डॉक्टर व्हायची इच्छा आहे, तर उमरत ही पत्रकारितेमध्ये करिअर करू इच्छिते. अफरोजाला शिक्षक होऊन विद्यार्थ्यांवर संस्कार करायचेत, तर कुलसुमला लष्करी अधिकारी व्हायचंय.

कोण आहेत अधिक कदम ?
नगरजिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील शेतकरी कुटुंबात जन्म. वडिलांप्रमाणेच कुस्तीत रस होता. पुण्याला पदवीचे शिक्षण घेत असताना १९९७ मध्ये काश्मीरचा राजकीय सामाजिक परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी प्रथम गेले. १५ दिवसांसाठी गेलेले कदम चार महिने तिथेच राहिले. आता इथेच सामाजिक काम करायचे, या निर्धाराने स्थायिक झाले.
अतिरेकी म्हणाले, ‘आप खुदा का काम कर रहे हैं’

‘बॉर्डरलेसवर्ल्ड फाउंडेशन’ची स्थापना मार्च २००२ मध्ये महाराष्ट्रात झाली. मात्र, माझ्या आणि भारती ममानीच्या मनात याची मुळे १९९७ मध्येच रुजली होती.१७ वर्षे आम्ही काश्मीरमध्ये राहत आहोत. या काळात १५ ते २० वेळा अतिरेक्यांनी माझे अपहरण केले. १९९९ मध्ये पहिल्यांदा मला भारतीला अतिरेक्यांनी अडवले. बंदुकीचा दस्त्याने मारले. पण आमच्या प्रामाणिकतेवर विश्वास बसला तेव्हा अतिरेकी म्हणाला, ‘आप खुदा का काम कर रहे हैं, सच्चा अल्ला का बंदा आप को नहीं मारेगा.’ नंतर त्याने सोडून दिले. -अधिक कदम, संचालक, बॉर्डरलेस फाउंडेशन

महिलांसाठी सहकारी तत्त्वावरील दुकान
महिलांनीखास महिलांसाठी चालवलेले काश्मीरमधले पहिले सहकारी तत्त्वावरील स्टोअर सुरू करण्याचे आता कदम यांनी ठरवले आहे. महिलांची अंतर्वस्त्रे, गर्भनिरोधनाची साधने, सॅनिटरी नॅपकीन अशा वस्तू इतर दुकानांत जाऊन घेण्यास महिला लाजतात. येथील मुस्लिम मुलींना तर पुरुषांशी बोलायला बरेच निर्बंध आहेत. यावर पर्याय म्हणून बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनच्या वतीने कुपवाडा जिल्ह्यात सहकारी तत्त्वावर महिलांसाठी विशेष दुकान सुरू केले जात आहे. संगणकाच्या मदतीने भरतकाम, शिवणकाम, फॅब्रिक पेंटिंग तसेच दागिने बनवणे, छपाई काम तसेच स्टेशनरी विक्री हे सर्व एकाच छताखाली या ठिकाणी मिळेल.