आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुरांताे अपघात : 110 किमी वेगात ब्रेक, तरीही नव्या डब्यांमुळे जीवितहानी नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साेलापूर- कल्याणजवळील वाशिंद रेल्वे स्थानकाजवळ नागपूर-मुंबई दुरांताे एक्स्प्रेसचे इंजिन व ९ डबे रुळांवरून घसरले. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही. एक्स्प्रेसचे मुख्य चालक वीरेंद्र सिंग व त्यांचे सहायक चालक अभय पाल जखमी झाले अाहेत. मंगळवारी सकाळी साडेसहा वाजता ही घटना घडली. अपघातामुळे मध्य रेल्वेचे दोन्ही मार्ग उखडले असून विद्युत ताराही तुटल्या आहेत. अनेक रेल्वेगाड्या रद्द करावा लागल्या. त्यांनी त्वरित ब्रेक लावले. त्यामुळे दुरांतो एक्सप्रेसचे ९ डब्यांसह इंजिनही घसरले आहे.  त्यामुळे मध्य रेल्वेचे दोन्ही मार्ग उखडले असून विद्युत ताराही तुटल्या आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी किमान १४ तास लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. तत्पूर्वी पंचवटी एक्सप्रेस, राज्यराणी या प्रवासी गाड्या घोटी आणि इगतपुरी स्थानकात थांबवण्यात आल्या, तर मंगला एक्सप्रेस  नाशिक रोड स्थानकातून पुन्हा मनमाड, पुणेमार्गे वळवण्यात आली होती. त्यामुळे प्रवाशांचा सुमारे ७ ते ८ तास प्रवासाची वेळ वाढली होती. त्यामुळे रेल्वेच्या प्रवाशांनी बस, खासगी वाहने यांनी मुंबईकडे जाण्यासाठी पसंती दिली. इगतपुरी, घोटीपर्यंत गेलेल्या राज्यराणी, पंचवटी एक्सप्रेस पुन्हा मनमाडपर्यंत परत पाठवण्यात आल्या. त्यामुळे अाैरंगाबाद, भुसावळ, नागपूरकडे जाणाऱ्या प्रवाशांनी मनमाडपर्यंत जाण्यास पसंती दिली होती.   

या  गाड्या धावल्या व्हाया मनमाड, दौंड , पुणे
हजरत निझामुद्दीन -एर्नाकुलम मंगला एक्स्प्रेस, हावडा -मुंबई दुरांतो, राजेंद्र नगर -कुर्ला एक्स्प्रेस, हावडा -मुंबई मेल, वाराणसी -कुर्ला एक्स्प्रेस, वाराणसी -मुंबई महानगरी एक्स्प्रेस, पाटलीपुत्र - कुर्ला एक्स्प्रेस, गोरखपूर -कुर्ला एक्स्प्रेस, गोरखपूर - वाराणसी व्हाया अलाहाबाद मार्गे धावणारी, हावडा - मुंबई गीतांजली एक्स्प्रेस, नांदेड - मुंबई तपोवन एक्स्प्रेस, वाराणसी -कुर्ला कामयानी एक्स्प्रेस, जबलपूर -मुंबई गरीबरथ एक्स्प्रेस.
 
अपघातामुळे या रेल्वेगाड्या रद्द  
- पुणे -मुंबई -पुणे  डेक्कन एक्स्प्रेस  
- पुणे -मुंबई -पुणे  इंद्रायणी एक्स्प्रेस 
- पुणे -मुंबई -पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस  
- गोंदिया -मंुबई - गोंदिया विदर्भ एक्स्प्रेस  
- मुंबई -अमरावती एक्स्प्रेस  
- पुणे -मुंबई -पूणे सिंहगड एक्स्प्रेस  
- पुणे - मुंबई -पुणे प्रगती एक्स्प्रेस  
- मुंबई - नांदेड तपोवन एक्स्प्रेस  
- कोल्हापूर -मुंबई - कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेस  
- मुंबई -मनमाड राज्यराणी एक्स्प्रेस  
- मुंबई - मनमाड पंचवटी एक्स्प्रेस  
- कुर्ला -मनमाड एक्स्प्रेस  
- नागपूर -मुंबई -नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस  
- नागपूर - मुंबई -नागपूर दुरांतो एक्स्प्रेस.

नवीन डब्यामुळे जीवितहानी नाही   
दुरांताे एक्स्प्रेससह अनेक जलद गाड्यांना जर्मन तंत्रज्ञानावर अाधारित एलएचबी दर्जाचे डबे असतात. हे डबे अॅल्युमिनियमपासून तयार केलेले असतात. त्यामुळे डब्यांचा वेग वाढताे, वजनालाही हलके असतात. आयसीएफ दर्जाचे पोलादाचे डबे सुपरफास्ट, एक्सप्रेसला जोडतात. याचे वजन ४० ते ४५ टन असते. तर एलएचबी डब्यांचे वजन ३० टन असते. दाेन्ही डब्यांची रचना  प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातूनच असते. अपघातानंतर हे डबे एकमेकांवर न चढता बाजूला पडतात व जीवितहानी टळते. दुरांताेच्या अपघातातही याच डब्यांमुळे प्रवासी सुरक्षित राहिले.

अाज रेल्वे वाहतूक पूर्ववत होण्याची आशा
जवळपास ३५० ते ४०० कर्मचारी खचलल्या रेल्वेमार्गाच्या दुरुस्तीचे काम करत अाहेत. क्रेनने डबे उचलण्याचे काम झाल्यानंतर मंगळवारी रात्री ११ वाजेपर्यंत डाऊन लाइनवरचे काम पूर्ण झाले. अप लाइनसाठी मात्र वेळ लागला. बुधवारी सकाळपर्यंत दोन्ही मार्ग सुरू होऊ शकतात.
 
जनशताब्दीसह अनेक रेल्वे मनमाडलाच खोळंबल्या, प्रवाशांसह चाकरमान्यांचे हाल
मनमाड- आसनगावजवळ नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसच्या अपघातानंतर मंगळवारी सकाळी ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक मोठ्या प्रमाणावर खोळंबली. याचा सर्वाधिक फटका मनमाड जंक्शन रेल्वेस्थानकाला बसला. येथून जाण्याच्या तयारीत असलेली मनमाड-कुर्ला गोदावरी एक्स्प्रेस ऐनवेळी रद्द करण्यात आली. त्यामुळे या गाडीने प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांसह चाकरमान्यांचे अतोनात हाल झाले. दरम्यान, मुंबईला जाणाऱ्या अनेक गाड्यांचा प्रवास मनमाड स्थानकातच खंडित करण्यात आला. यात जालना-दादर जनशताब्दी एक्स्प्रेसचाही समावेश आहे.   

मनमाडहून सकाळी निघालेली राज्यराणी, पंचवटी एक्स्प्रेस या दोन्ही गाड्या इगतपुरी येथेच खंडित करण्यात आल्या. नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस मनमाड  स्थानकात पाच तास खोळंबली होती. त्यानंतर ही गाडी नाशिकपर्यंत मार्गस्थ झाली. वाहतूक पूर्ववत होण्याची शक्यता धूसर झाल्याने येणाऱ्या अनेक गाड्यांचा मार्ग कल्याण-पुणे-दौंड-मनमाड असा बदलण्यात आला. यात वाराणसी एक्स्प्रेस, मुंबई-मनमाड तपोवन एक्स्प्रेसचा समावेश आहे. मुंबईला जाणाऱ्या गाड्यांचा मार्ग पुणे-दौंड-मुंबई असा करण्यात अाला.   

सण-उत्सवाच्या काळात अडचणी   
गणेशोत्सव तसेच गौरीच्या आगमनामुळे मुंबई, कल्याण या ठिकाणी जाण्यासाठी मंगळवारी मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. मात्र, रेल्वे रद्द झाल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. रेल्वेसेवा कधी सुरळीत होईल, याबाबत माहिती नसल्याने अनेकांनी आपला प्रवास रद्द केला. दरम्यान, रेल्वेच्या अपघातानंतर अनेक प्रवाशांनी आपला संताप व्यक्त केला.

इगतपुरीतून हजारो प्रवासी एसटी, खासगी वाहनाने झाले रवाना
दुरांतो एक्स्प्रेसच्या अपघातामुळे अनेक रेल्वेगाड्या इगतपुरी रेल्वेस्थानकापासून रद्द करण्यात आल्या. यामुळे हजारो रेल्वे प्रवाशांना स्थानकाबाहेरून एसटी बसेस व खासगी वाहनाने प्रवास करण्याची वेळ आली. दरम्यान, पावसामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.   

सकाळी  ७ वाजेच्या सुमारास इगतपुरी रेल्वेस्थानकावर पंजाब मेल व राज्यराणी एक्स्प्रेस, भुसावळ-पुणे एक्स्प्रेस, पंचवटी एक्स्प्रेस अाल्या. मात्र, अपघातामुळे त्यांना इगतपुरी रेल्वेस्थानकातून परतीच्या मार्गाने रवाना करण्यात आले. या वेळी मुंबई, पुणे, नाशिककडे जाणाऱ्या प्रवाशांंना लहान मुलांसह भरपावसात एसटी व  खासगी वाहनाने प्रवास करावा लागला. काही प्रवाशांनी नाशिककडे धाव घेतली. काहींनी खासगी वाहनांनी मुंबई, कल्याण तसेच काही प्रवाशांना मुंबई महामार्गावर जाऊन तेथून मार्गक्रमण करावे लागले.

नाशिक : खासगी वाहनधारकांकडून प्रवाशांची लूट
आसनगावजवळ झालेल्या रेल्वे अपघातामुळे मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली होती. यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी मंगळवारी नाशिक एसटी विभागातून कल्याणसाठी ९० जादा बसेस सोडण्यात आल्या. रेल्वे उपलब्ध नसल्याने खासगी वाहनधारकांनी मुंबईला जाण्यासाठी प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारून लूट केली. 
  
कामानिमित्त याचबरोबर सण-उत्सवानिमित्त मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असल्याने एकच गोंधळ निर्माण झाला होता. यामुळे अनेक प्रवाशांकडून बसचा मार्ग स्वीकारण्यात आल्याने महामार्ग बसस्थानकासह इतर बसस्थानकावर प्रचंड गर्दी झाली होती. मुंबईला जाण्यासाठी  रेल्वे रद्द झाल्याने बसस्थानकांवर झालेल्या प्रचंड गर्दीचा फायदा घेत प्रवासी वाहतूक करणाऱ्या ट्रॅव्हल्स, टॅक्सीचालकांनी थेट ४०० ते ५०० रुपये भाडे अाकारले. रेल्वे अचानक रद्द झाल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
बातम्या आणखी आहेत...