नागपूर- राज्यातील दुष्काळी स्थिती आणि शेतक-यांच्या वाढत चाललेल्या आत्महत्या या गंभीर विषयावरून विरोधी पक्षांनी एकजूट करीत सरकारवर हल्लाबोल केला. शेतक-यांना सरकारने तत्काळ पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीत सोमवारी फाटाफूट दिसल्यानंतर त्यातून बोध घेत हे दोन्ही विरोधक एकत्र आले व सरकारला आज दोन्ही सभागृहात धारेवर धरले.
राज्यातील दुष्काळाची स्थिती भीषण आहे. शेतक-यांच्या आत्महत्याही वाढल्या आहेत. याप्रश्नी सरकारने आतापर्यंत काय-काय उपाययोजना केल्या याची माहिती द्यावी व चर्चा करावी अशी मागणी विरोधकांनी विधानसभा व विधान परिषदेत केली. मात्र, सत्ताधारी नेत्यांनी शेतक-यांना लवकरच त्यांच्या हातात मदत मिळेल असे सांगायला सुरुवात केली. नेमकी कधी आणि किती याची माहिती द्यावी असे सांगत विरोधकांनी दोन्ही सभागृहात गदारोळ करण्यास केली. यानंतर सत्ताधारी व विरोधकांत चांगलीच खडाजंगी झाली व त्यावरून गोंधळ निर्माण झाला. अखेर सभागृह प्रमुखांनी अर्ध्या तासांसाठी दोन्ही सभागृहे तहकूब केली.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी या विरोधकांमध्ये फाटाफूट असल्याचे चित्र अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सोमवारी दिसून आले होते. त्याचा थेट फायदा सत्ताधारी भाजप उठविण्याच्या तयारीत आहे. मात्र, त्यापूर्वीच शहाणे होत काँग्रेस-राष्ट्रवादीने शेतक-यांच्या मुद्यांवर एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. भाजप- शिवसेना यांच्यात युती झाल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात भविष्यातील गरज म्हणून एकमेकांशी संधान साधण्याच्या हालचाली सोमवारी सायंकाळपासून सुरू केल्या आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची पहिलीच संयुक्त बैठक सोमवारी रात्री विधान परिषद उपसभापतींच्या निवासस्थानी पार पडली.
काँग्रेसच्या वतीने प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, गटनेते विखे पाटील तर राष्ट्रवादीच्या वतीने अजित पवार आणि सुनील तटकरे या वेळी उपस्थित होते.
आपल्यात फाटाफूट होणे ही बाब दोन्ही काँग्रेसच्या भवितव्याच्या दृष्टीने फायदेशीर नाही असे स्पष्ट करीत त्यांनी दुष्काळ, शेतकरी आत्महत्या व जनतेच्या मुद्यांवर एकत्र येण्याचा निर्णय घेतला. या चारही नेत्यांनी रोजच्या रोज एकत्र येऊन पुढच्या दिवसाची रणनीती आखायची असा निर्णय घेतला आहे. रोज रणनीती ठरवून अधिवेशनात एकत्र येण्याचा तसेच सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घ्यायची असे ठरवण्यात आले आहे. त्याचे पडसाद आज दुस-या दिवशी विधानसभेचे कामकाज सुरु होताच पडले. काँग्रेसचे गटनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत राज्यातील दुष्काळी स्थिती व शेतक-यांच्या आत्महत्या यावर चर्चा व्हावी अशी मागणी करताच सभागृहात गदारोळ व गोंधळ सुरु झाला.