मुंबई - कधी उशिरा येण्याने त्रास होतो असे कारण देऊन, तर कधी अविवाहित असल्याची सबब सांगून मराठी कलाकारांना पुण्या-मुंबईसारख्या पुढारलेल्या शहरांमध्ये अनेक सोसायट्या घर देण्यास नकार देत आहेत. राष्ट्रीय पुरस्कार विजेता नागराज मंजुळे, ‘आजोबा’फेम सुजय डहाके यांसारख्या कलाकारांनाही या संकुचित मानसिकतेला सामोरे जावे लागले आहे.
अविवाहित राहतात म्हणून नैतिकतेचा प्रश्न उभा करत सोसायट्यांनी या कलाकारांना घरे देण्यास नकार देऊन त्यांच्या सेलिब्रेटी असण्याकडे तर दुर्लक्ष केलेच, शिवाय कलाकार असण्याच्या व्यवसायापुढेही अशा सोसायट्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. त्यामुळे मराठीमध्ये नव्याने रुजू पाहणार्या कलाकारांना पुण्या-मुंबईत स्थिरावताना त्रास होत आहे. मराठी चित्रपटसृष्टीमध्ये फँड्रीसारख्या देश-परदेशात गाजणार्या सिनेमाची भर घालणार्या नागराजला पुण्यात तसेच मुंबईत घर शोधताना सोसायट्यांच्या नकाराचा सामना करावा लागला होता.
मध्यमवर्गीय सोसायट्यांमध्ये राहण्यासाठी केवळ बॅचलर असल्यामुळे तसेच रात्री उशिरा येण्यामुळे घर भाड्याने देणे नाकारले जाते हा मेट्रो व कॉस्मोपॉलिटन शहरातील धक्कादायक अनुभव असल्याचे या कलाकारांचे म्हणणे आहे. ‘शाळा’, ‘आजोबा’ यासारखे सामाजिक बांधिलकी व आत्मीयता असणारे चित्रपट काढणारा दिग्दर्शक सुजय डहाके यालाही याच अडचणींमधून सामोरे जावे लागले. नुकतीच त्याचीही घर मिळण्याची समस्या मुश्किलीने सुटली आहे. स्मिता तांबेंसारख्या एकट्या राहणार्या अभिनेत्रींनाही अशा समस्येचा सामना करावा लागला आहे.
- अत्यंत संवेदनशील चित्रपट आतापर्यंत मी दिले आहेत. असे असताना कास्टिंग काऊच वा इतर प्रकारची भीती व्यक्त करत मला कित्येक दिवस कुणी घर द्यायला तयार नव्हते. मागच्याच महिन्यात माझी ही अडचण कशीबशी दूर झाली आहे.-सुजय डहाके, दिग्दर्शक, आजोबा.
- आम्ही केवळ एकटे राहतो म्हणून या सोसायट्या नैतिकतेचा प्रश्न उभा करतात. सरसकट सगळ्यांनाच असा समान नियम का लावला जातो कळत नाही. आम्ही कुठल्या संवेदनशीलतेची माणसं आहोत हे लक्षात घेतलं जात नाही. पुण्यात संकुचित मानसिकता मोठय़ा प्रमाणात आढळून येते. नागराज मंजुळे, दिग्दर्शक, फँड्री
(फोटो - नागराज मंजुळे, सुजय डहाके)