आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Nagraj Munjale News In Marathi, Divya Marathi, Marathi Film Industry

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जाणीव-नेणिवेतही माध्यमांतर व्हावे, प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांची अपेक्षा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 'शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला, फँड्री यासारख्या चित्रनाट्य कलाकृतींमुळे दलित वास्तवाचे माध्यमांतर झाले असले, तरी ते अपूर्णच आहे. चित्रकला, शिल्पकला, संगीत अशा सर्व कलाप्रकारांत ते प्रतिबिं‍त होतानाच आपल्या जाणीव-नेणिवेतही पाझरण्याची गरज आहे,’ असे प्रतिपादन पिचत्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी केले. कवी लोकनाथ यशवंत आणि मंजुळे यांना पद्मश्री दया पवार स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी ते बोलत होते.

पाच हजार रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मण गायकवाड अध्यक्षस्थानी होते. या वेळी शाहीर संभाजी भगत, लेखिका ऊर्मिला पवार,दया पवार प्रतिष्ठानच्या अध्यक्षा हिरा दया पवार, पत्रकार युवराज मोहिते उपस्थित होते.
‘कविता लहान कलाकृती आहे; पण तीच सर्वाधिक ज्वालाग्रही असते. मराठीत बहिणाबाई चौधरी महान कवयित्री असून त्यांच्या काव्याचा आपल्यावर प्रभाव आहे. माझी कविता विदर्भातील आहे. मी अकरावी फेल आहे. मात्र, राज्यातल्या सर्वच विद्यापीठांत ती अभ्यासली जात असून तिच्यावर चित्रपट, नाटक येत असल्याने माझ्या कवितेचेही माध्यमांतरच झाले,’ असे कवी यशवंत यांनी सांगितले.

गायकवाड म्हणाले की, ज्या वडार समाजाने आजवर येथे अनेक मंदिरे बांधली, देवाच्या मूर्ती घडवल्या, परंतु ‘फँड्री’सारख्या भेदक वास्तवतेने त्याच वडार समाजाची नागराज मंजुळे ही दांभिकता फोडायला निघाला आहे.’

शाहीर भगत म्हणाले, ‘मला माझा मेसेज देता आला पाहिजे, अशी कोणताही कलाप्रकार हाताळताना माझी पूर्वअट असते, अन्यथा मी त्या फंदात पडत नाही. त्यामुळेच मी मुळात शाहीर असूनही ‘शिवाजी अंडरग्राउंड’ किंवा ‘मुंबई १७’ अशा नाट्यकृती निर्माण करू शकलो.’
प्रतिष्ठानच्या अध्यक्ष हिरा पवार यांनी प्रास्ताविक केले. प्रियांका डहाळे यांनी आभार मानले.
कवयित्री प्रज्ञा दया पवार यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. शाहीर संभाजी भगत यांच्या गाण्याने कार्यक्रमाचा समारोप झाला.