आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पँथरचा इतिहास नव्याने उलगडणार; नामदेव ढसाळांच्या अखेरच्या पुस्तकाचे शनिवारी प्रकाशन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- दलित पँथर म्हणजे बेदरकार भाषणे, गर्दी खेचणार्‍या वादळी सभा, हाणामारी, मोर्चे आणि पोलिस केसेस. पॅँथरच्या जन्मापासून (1972) ते फुटीपर्यंतचा (1978) धगधगता इतिहास नव्याने समोर येत आहे. पँथरचे संस्थापक, दिवंगत कवी नामदेव ढसाळ यांनी अखेरच्या दिवसांत शब्दबद्ध केलेल्या ‘दलित पँथर : एक संघर्ष’ या पुस्तकाचे शनिवारी मुंबईत प्रकाशन होत आहे.

पँथरच्या संस्थापकांपैकी असलेल्या नामदेव ढसाळ यांचे अलीकडेच निधन झाले, तत्पूर्वी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असतानाच्या तीन महिन्यांच्या काळात त्यांनी पँथरचा संघर्ष 320 पानांमध्ये शब्दबद्ध केला आहे. त्यामुळे खुद्द ढसाळ यांच्या शब्दांतच पँथरचा पट आता उलगडला जाणार आहे.

डांगळेंची प्रस्तावना
मुंबईतील भाष्य प्रकाशन यांनी अवघ्या 15 दिवसांत हा ग्रंथ तयार केला आहे. ढसाळ यांच्या या अखेरच्या पुस्तकाच्या निर्मितीत जराही तडजोड केलेली नाही, अशी माहिती प्रकाशकानी ‘दिव्य मराठी’ला दिली. पँथरचे नेते, कवी अर्जुन डांगळे यांची या ग्रंथास प्रस्तावना असून नामदेवची अनेक दुर्मिळ छायाचित्रे यात पुस्तकात समावेश आहे.

सर्व घडामोडींचा समावेश
पँथरचा जन्म, खरे संस्थापक, फुटीची कारणे, नेत्यांमधील विसंवाद, वरळीची दंगल, गीतेचे दहन, शिवसेनेबरोबरील मारामार्‍या, शंकराचार्यांना जोड्याने मारहाण, वादग्रस्त जाहीरनामा, आणीबाणीला दिलेला पाठिंबा, विद्यापीठ नामांतराचा लढा, रिडल्स प्रकरण, पँथरमधील फाटाफूट ते शिवसेनेशी केलेला घरोबा इथपर्यंतची सारी हकीगत नामदेव यांच्या तोंडून या ग्रंथात उतरली आहे.

शनिवारी नामदेवचा 65 वा जन्मदिवस आहे. त्याचे औचित्य साधत दादर येथील आंबेडकर भवनात नामदेव ग्रंथरूपाने भेटीस येतो आहे. पँथरचे त्या वेळचे सक्रिय कार्यकर्ते जयदेव गायकवाड यांच्या हस्ते या ग्रंथाचे प्रकाशन होत असून मल्लिका अमर शेख, सतीश काळसेकर, प्रज्ञा दया पवार या वेळी नामदेवच्या कवितांचे वाचन करणार आहेत. नामदेवचे गद्यलेखन फारच अल्प आहे. या ग्रंथामुळे 80 च्या दशकातील दलित चळवळीचा इतिहास नामदेवच्या नजरेतून उलगडणार आहे. त्यामुळेच मोलाचा राजकीय-सामाजिक दस्तऐवज असणार्‍या ‘दलित पँथर : एक संघर्ष’ या गं्रथाविषयी उत्सुकता आहे.

धमक्यांवर धमक्या
पँथरच्या फुटीस जबाबदार असणार्‍यांची नामदेवने या गं्रथात पोलखोल केली आहे. म्हणून, हा ग्रंथ प्रकाशित होऊ नये, अशी अनेकांची इच्छा होती. त्यामुळे आपल्याला धमक्या येत असल्याचे गं्रथाचे प्रकाशक महेश भारतीय यांनी सांगितले.