आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नामदेव ढसाळांना अखेरचा जय भीम!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - प्रस्थापित व्यवस्थेला धक्के देणारा बंडखोर कवी, दलित पँथर संघटनेचे संस्थापक आणि ज्येष्ठ विचारवंत पद्मश्री नामदेव लक्ष्मण ढसाळ गुरुवारी सायंकाळी अनंतात विलीन झाले. दादर येथील स्मशानभूमीत विद्रोहाच्या या ज्वालामुखीला अखेरचा निरोप देण्यासाठी त्यांचे चाहते मोठ्या संख्येने जमले होते.
बुधवारी पहाटे ढसाळ यांचे बाँबे रुग्णालयात प्रदीर्घ आजाराने निधन झाले होते. गुरूवारी सकाळी त्यांचे पार्थिव रुग्णालयामधून वडाळा येथील सिद्धार्थ विहार मैदानावर आणण्यात आले. तेथे अत्यंदर्शनासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर व राज्यभरातील असंख्य कार्यकर्त्यांची रिघ लागली होती. या पार्श्वभूमीवर दादरपासून वडाळ्यापर्यंत चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. नामदेव ढसाळ यांचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील पूर, या ठिकाणाहून त्यांचे नातेवाईक व काही ग्रामस्थही अंत्यदर्शनासाठी आले होते. नामदेव यांचे चुलतभाऊ बाळासाहेब ढसाळ तसेच पुण्यातील त्यांचे मावसभाऊ जयदेव गायकवाडही उपस्थित होते.
दुपारी तीन वाजता वडाळा ते चैत्यभूमी या रस्त्यावरून अंत्ययात्रा काढण्यात आली. हजारोंच्या संख्येने लोक यात सहभागी झाले होते. त्यामुळे दुपारनंतर वडाळा ते शिवाजी पार्क मार्गावरील सर्व रस्ते बंद करण्यात आले होते. ‘नामदेव ढसाळ अमर रहे’ अशा घोषणा यावेळी दिल्या जात होत्या. गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी राज्य शासनाच्या वतीने ढसाळ यांना पुष्पचक्र अर्पण केले आणि श्रद्धांजली वाहिली. वीररत्न भन्ते यांनी पार्थिवावर धम्मविधी केला. उपस्थित लोकप्रतीनिधी आणि साहित्यिकांनी ढसाळ यांनी आपापल्या भावना व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
व्हीआयपींची गर्दी : बाळासाहेब थोरात, नितीन राऊत, राज ठाकरे, जितेंद्र आव्हाड, छगन भुजबळ, अबू आझमी, नितीन सरदेसाई, मोहन रावले, मधू चव्हाण, अजित सावंत, जोगेंद्र कवाडे, जांबुवंत धोटे, एकनाथ गायकवाड, गजानन किर्तीकर, रामदास आठवले, प्रकाश रेड्डी, भाई वैद्य, आर. आर. पाटील, कपिल पाटील, भाई गिरकर, चंद्रकांत हंडोरे, सदा खोत आदी विविध राजकीय पक्ष व संघटनांच्या नेत्यांनी पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. संभाजी भगत, अशोक नायगावकर, सुधींद्र कुलकर्णी, रावसाहेब कसबे, कवयित्री नीरजा, सतीश काळसेकर आणि प्रख्यात गीतकार गुलजार या कवींनी हजेरी लावली.
तीन फैरींची सलामी : पद्मश्री पुरस्कार प्राप्त असल्याने नामदेव ढसाळ यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. दादर येथील स्मशानभूमीत पोलीस दलाने तीन फैरी झाडून ढसाळ यांना मानवंदना दिली.
यावेळी ढसाळ यांचे पार्थिव तिरंग्यात लपटलेले होते.
वाघांचा वाघ आला
दादरमधील शिवसेना भवनासमोर नामदेव ढसाळ यांची अंतयात्रा आली, तेव्हा रिपब्लिकन चळवळीतील कार्यकर्त्यांनी ‘कोण आला रे कोण आला, वाघांचा वाघ आला!’ अशा गगनभेदी घोषणा दिल्या. मनोहर जोशी, दिवाकर रावते, सदा सरवणकर या शिवसेनेच्या नेत्यांनी शिवसेना भवनासमोर ढसाळ यांच्या पार्थिवाला पुष्पहार अर्पण केले.
उद्धव ठाकरे, ढाले, आंबेडकर यांची पाठ
ढसाळ यांचे सहकारी कवी राजा ढाले, भारिप बहुजन पक्षाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व एकेकाळचे रिपब्लिकन चळवळीचे ज्येष्ठ नेते व सध्याचे बिहारचे राज्यपाल रा. सु. गवई, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अंत्यविधीला असलेली गैरहजेरी सर्वांच्या चर्चेचा विषय ठरली.