आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Namdev Dhasal News In Marathi, Marathi Poet, Divya Marathi

मृत्यूनंतरही हेळसांड : नामदेव ढसाळ यांच्या घरावर बँकेने जप्तीची नोटीस पाठवली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गोलपिठा, तुही यत्ता कंची, गांडू बगीच्या, या सत्तेत जीव रमत नाही असे कैक प्रसिद्ध कवितासंग्रह ज्याच्या नावावर आहेत, दलित पँथरची ज्यांनी स्थापना केली, ते थोर बंडखोर लेखक, कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या घरावर बँकेने जप्तीची नोटीस पाठवली आहे.
नामदेव ढसाळ यांनी पाच वर्षापूर्वी मुंबईतील शालिनी सहकारी बँकेकडून टोयाटो गाडीसाठी पाच लाखांचे कर्ज घेतले होते. त्या कर्जाची फेड ढसाळ त्यांच्या हयातीत करू शकले नाहीत. त्यामुळे व्याजासह या कर्जाची रक्कम आता ९ लाख इतकी झाली आहे.
ढसाळ हे पश्चिम अंधेरीमधील लोखंडवाला या उच्चभ्रू वसाहतीत राहत होते. फ्लोरिडा सोसायटीत तिसऱ्या मजल्यावर त्यांची सदनिका आहे. या सदनिकेवर शालिनी सहकारी बँक थकीत वाहन कर्जापोटी टाच आणू पाहत आहे. शालिनी बँक मूळची सांगली जिल्ह्यातील आहे. बँकेने बजावलेल्या नोटिसीनंतर अनेकांना धक्का बसला.

ढसाळ मूळचे पुणे जिल्ह्यातील. नागपाड्याच्या कामाठीपुरा या वेश्या वस्तीत त्यांचे बालपण गेले. स्थिरस्थावर झाल्यावर त्यांनी अंधेरीच्या शास्त्रीनगर या पॉश वस्तीत सदनिका घेतली. ढसाळ यांचे १५ जानेवारी २०१४ रोजी निधन झाले. या सदनिकेत सध्या त्यांची पत्नी मल्लिका आणि मुलगा आशुतोष राहतात.

दलित चळवळीचे प्रमुख शिलेदार
साहित्याच्या माध्यमातून दलितांच्या व्यथा, वेदनांना वाचा फोडणारे नामदेव ढसाळ दलित चळवळीचे एक प्रमुख शिलेदार होते. महाराष्ट्राबरोबरच देशाच्या राजकारणाला हादरा देणाऱ्या ‘दलित पँथर' या आक्रमक संघटनेचे ते संस्थापक अध्यक्ष होते. दलित चळवळीतील समवयस्क सहकाऱ्यांच्या व साहित्यिकांच्या साथीने त्यांनी १९७२ मध्ये पँथरची स्थापना केली. अमेरिकेतील ‘ब्लॅक पँथर' चळवळीपासून प्रेरणा घेऊन जन्मलेल्या या संघटनेने दलित चळवळीला एक आक्रमक चेहरा दिला. दलितांच्या अनेक प्रश्नांवर उग्र आंदोलने केली. तत्कालीन सरकारांना दलित हिताच्या भूमिका घ्यायला भाग पाडले.
त्या वेळच्या प्रत्येक आंदोलनात ढसाळ यांनी हिरीरीने भाग घेतला. कालांतराने या चळवळीत फूट पडली. अनेक नेत्यांनी आपापले पक्ष स्थापन केले. मात्र, ‘दलित पँथर'शी ढसाळ यांचे नाते अखेरपर्यंत कायम होते.

मृत्यूनंतरही हेळसांड
ढसाळ जन्मभर कैफात जगले. बंडखोरी हा त्यांचा आणि त्यांच्या कवितेचा आत्मा होता. त्यांच्या कवितांचे जगभर महोत्सव भरतात. 'संत तुकारामानंतर नामेदव ढसाळ' असेही म्हटले जाते. अशी कीर्ती मिळवणाऱ्या कवीच्या घराची आणि त्याच्या वारसांच्या हेळसांडीमुळे मुंबईतील सांस्कृतिक विश्वात संताप व्यक्त होत आहे.

नोटिसीला उत्तर देणार
ढसाळ यांनी कर्ज वाहनावर घेतले होते. त्यासाठी तारण म्हणून घर ठेवलेले नाही. बँकेने वाहनाचे कर्ज घरावर चढवले आहे. बँकेच्या नोिटसीला आपण वकिलामार्फत उत्तर देणार आहोत, अशी माहिती ढसाळ यांच्या पत्नी कवयित्री मल्लिका अमरशेख यांनी दिव्य मराठीला दिली.