आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ढसाळ परतले महायुतीकडे, रिपाइंतर्फे मुंबईत दोन जागा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - शिवशक्ती-भीमशक्तीची मोट बांधण्याचे स्वप्न पाहणारे आणि त्यासाठी प्रयत्नरत असलेले दलित पँथरचे अध्यक्ष नामदेव ढसाळ शिवसेना भवनात झालेला अपमान विसरून गुरुवारी पुन्हा महायुतीकडे परतले आहेत. रिपाइंतर्फे दलित पँथरला मुंबईत दोन जागा सोडण्यात येणार असून शिवसेना-भाजपने आणखी तीन जागा द्याव्यात, अशी मागणीही नामदेव ढसाळ यांनी केली.
जागावाटपाच्या वेळी शिवसेना भवनात अपमान झाल्यामुळे ढसाळ बैठक सोडून बाहेर पडले होते आणि आठवले यांच्याशी संबंध तोडल्याचेही त्यांनी जाहीर केले होते. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवडसाठी काँग्रेसबरोबर हातमिळवणी केली होती. मात्र गुरुवारी रामदास आठवले आणि नामदेव ढसाळ एकत्र आले आणि दिलजमाई झाल्याची घोषणा करण्यात आली.
ढसाळ म्हणाले की, अपमानानंतर मी बाहेर पडलो तेव्हा मला आठवले व उद्धव ठाकरेंनी फोन केला, माफीही मागितली. मुंबईत आम्ही पाच जागा मागितल्या होत्या. रिपाइं त्यांच्या कोट्यातील दोन जागा आम्हाला देत आहे. आता भाजप आणि शिवसेनेने त्यांच्या कोट्यातील तीन जागा द्याव्यात, अशी मागणी मी करीत आहे. शिवसेनेने जागा सोडल्या नाहीत तर शिवसेनेच्या उत्तरदायित्वाचा विचार करावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.