आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रकल्पग्रस्तांची नावे गायब; मोबदला याद्या दलालांकडे, मुंबई-गोवा महामार्ग प्रकरणी चौकशीची मागणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - प्रकल्पग्रस्तांची नावे सातबाऱ्यावरून गायब झाल्याचा प्रकार मुंबई-गोवा महामार्ग मोबदला प्रकरणात समोर आला आहे. विशेष म्हणजे हा प्रकार सरकारी अधिकाऱ्यांच्या संमतीने सुरू असून कोट्यवधी रुपयांचा मोबदला व्यवहार लवकर हवा असेल तर प्रांताधिकाऱ्यांना मोबदल्याची ५ टक्के आणि आम्हाला १ टक्का रक्कम द्या, अशी मागणी रायगड जिल्ह्यातील माणगाव परिसरातील शेतकऱ्यांकडे दलाल करत आहेत. विशेष म्हणजे मोबदला वाटपाच्या सरकारी याद्या दलालांकडे असून या प्रकरणी मोठा भ्रष्टाचार सुरू असून याची तातडीने चौकशी करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.  

 
सातबाऱ्यावरून नावे गायब झालेल्या प्रकल्पग्रस्तांपैकी  एक असलेल्या शरद सावंत यांनी  पत्रकार परिषद घेऊन सरकारी भ्रष्टाचाराचा पोलखोल केला. माणगाव तालुक्यातील साले गावातील १७०/१ ही जमीन सावंत यांची असून प्रकल्पग्रस्त म्हणून सावंत यांना मोबदला देण्याऐवजी त्यांच्या नावाने नोटीस काढण्यात आली नाही. सातबाऱ्यावरून त्यांचे नाव गायब करण्यात आले असून बाळू मोनकर, भागी मोनकर, प्रकाश भोनक, अनंता मोनकर यांची नावे लागली आहेत आणि त्यांच्या नावाने मोबदल्याच्या नोटिसा निघाल्या आहेत. याविषयी प्रांताधिकारी बाळासाहेब तिडके यांच्याकडे तक्रार केली असता त्यांनी हे  प्रकरण निलंबित असल्याचे सांगून कानावर हात ठेवले.    
 
याशिवाय माणगाव तालुक्यातील कळमजे गावातील सर्व्हे क्रमांक ६९/२ ही जमीन ही सावंत यांच्या नावावर आहे. काही कामासाठी सावंत यांना जमिनीचा सातबारा हवा होता. तो त्यांनी काढला असता सातबाऱ्यावरून त्यांचे नाव गायब करून गुणा यशवंत मुंडे, गौरी धोंडू जाधव, उमा भक्कम, संभाजी महादू वाढवळ, सखाराम महादू वाढवळ यांची नावे लागली आहेत. तहसीलदार ऊर्मिला पाटील यांच्याकडे या प्रकरणी तक्रार करूनही सावंत यांना न्याय मिळालेला नाही.    
 
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग, गोव्यातील महामार्गलगतच्या हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी संपादीत करण्यात आल्या असून त्यांना चौपट मोेबदला देण्यात आला आहे. हा मोबदला लाखो, करोडोंच्या घरात असल्याने  अनेकांची सातबाऱ्यावरून नावेच गायब करून मूळ शेतकऱ्यांची फसवणूक केली जात असल्याची असंख्य प्रकरणे आता उघड होत आहेत.
बातम्या आणखी आहेत...