अहमदनगर- मराठवाडा आणि विदर्भात दुष्काळाने हाहाकार माजला आहे. अशा वेळी अभिनेते नाना पाटेकर शेतक-यांत जाऊन काम करीत आहेत. शुक्रवारी नाना पाटेकर अहमदनगरमधील शेतक-यांसमवेत होते. त्यावेळी नानांनी सर्वसामान्यांना चांगलेच फटकारले.
नाना म्हणाले, दुष्काळावर गप्प बसणे हे गुन्हा केल्याप्रमाणेच आहे. नेत्यांनी शेतक-यांत जाऊन विचारपूस केली पाहिजे. लोकांना
आपल्या येथील व्यवस्थेला (सरकार-प्रशासन) प्रश्न विचारण्याचा हक्क आहे. राजकीय नेत्यांनी येथे येऊन पाहिले पाहिजे की, लोक आत्महत्या का करीत आहेत. पुढील दोन महिने फार त्रासदायक आहेत. त्यासाठी आताच उपाययोजना करायला हवेत असेही नानांनी सांगितले.
नाना पुढे म्हणतात की, जर कोणी तुमच्या कारच्या खिडकीजवळ येऊन उभे राहिला व काही मागितले तर त्यांना भिखारी समजू नये कारण ते शेतकरी असू शकतात. शेतकरी सध्या हतबल आहे. त्याला जेवण, पाणी आणि टॉयलेटची सुविधा हवी आहे. आपण लोक एका व्यक्तीची तरी काळजी घेऊ शकतो. जे सहज शक्य आहे.
महाराष्ट्रात आयपीएलचे सामने आयोजित करण्याबाबत नानाला छेडले असता नाना म्हणाले. येथे लोक मरत आहेत, आत्महत्या करीत आहेत. अशा वेळी आम्ही आनंद कसा लुटू शकतो. अशा वेळी आम्ही सेलिब्रेशनपासून दूर राहिले पाहिजे.
अभिनेत्री प्रत्यूषा बॅनर्जीच्या आत्महत्येविषयी बोलताना नाना म्हणाले, प्रत्यूषाच्या आत्महत्येने मला दु:ख झाले आहे. मात्र, रोज तिच्या आत्महत्येबाबतच्या बातम्या पहिल्या पानावर देऊन आपण काय मिळवणार आहोत? इंद्राणी मुखर्जीने किती वेळा आणि कोणाकोणाशी लग्न यात सांगण्यासारखे काय आहे? आता मला ही वृत्तपत्रे वाचण्याचाही तिटकारा येऊ लागला आहे असे नाना पाटेकर यांनी सांगितले.