आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nana Patekar To Participate In Loksabha Election By Bjp Seat!

लोकसभेसाठी प्रिया दत्तच्या विरोधात नाना पाटेकर, \'आप\'कडून अनुपम खेर?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- अभिनेता नाना पाटेकर उत्तर मध्य मुंबईतून भाजपच्या तिकीटावर लोकसभा लढविण्याची शक्यता आहे. त्यामुळे नानांच्या रुपाने खासदार प्रिया दत्त यांच्यासमोर एक तगडे आव्हान उभे राहणार असल्याचे दिसून येत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नाना पाटेकरने सक्रिय राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपने नानाशी संपर्क साधल्यानंतर अगोदर नाही म्हणणाऱ्या नानाने आपला निर्णय बदलत लोकसभेला उभे राहण्याची तयारी दर्शविली आहे. भाजपनेही नानाच्या उमेदवारीला ग्रिन सिग्नल दिला आहे. अंधेरी, जुहू या परिसरात बॉलिवूडची मंडळी राहत असलेल्या मतदारसंघातून प्रिया दत्तच्या विरोधात नानाला उभे करण्यात येणार आहे. स्थानिक पातळीवरून नानाची शिफारस केंद्रीय पातळीवर केलेली आहे. लवकरच तेथून नानाच्या नावाची घोषणा होणार असल्याचे कळते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपला उत्तर-मध्य मुंबईतून प्रिया दत्तच्या विरोधात दमदार उमेदवार मिळत नव्हता. प्रिया दत्तचा जर पराभव करायचा असेल तर बॉलिवूडमधील चेहरा हवा असे भाजपच्या नेत्यांचे म्हणणे होते. त्यामुळे मराठमोळया नाना पाटेकरच्या नावाला भाजपने पसंती दिली आहे. याबाबत भाजपने नानाकडे विचारपूस केली होती. मात्र नानाने राजकारण आपला पिंड व प्रांत नाही असे ठासून सांगितले होते. मात्र, भाजपच्या नेत्यांनी नानाशी सतत संपर्क साधून प्रिया दत्तच्या विरोधात निवडून येण्याची किती व कशी शक्यता आहे हे पटवून दिले.
नाना मराठी असल्याने स्थानिक मराठी माणसांची मतेही नानाला मिळू शकतात. याचबरोबर बॉलिवूडमध्ये नानाला आदराचे स्थान आहे. त्यामुळे प्रिया दत्तला पडणारी मते नाना आपल्याकडे खेचू शकतो असा अंदाज भाजपला आहे. हीच बाब नानाला सांगण्यात भाजप यशस्वी झाला आहे. त्यामुळे नानाने होकार दिल्याचे कळते. याबाबत नाना पाटेकरने नरेंद्र मोदींशीही चर्चा केल्याचे सूत्रांनी सांगितले. आता नानाच्या उमेदवारीचा निर्णय राजनाथ सिंहांच्या पातळीवर उरला आहे. मोदी व मुंबईतील भाजपच्या नेत्यांनी सर्व सोपस्कर पार पाडल्याने राजनाथांकडून नानाच्या नावाची घोषणाच होणे बाकी आहे, अशी माहिती सूत्रांकडून कळत आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीत प्रिया दत्तच्या विरोधात भाजपचे नेते महेश जेठमलानी यांनी निवडणूक लढविली होती. मात्र त्यांचा कसलाही निभाव लागला नाही. प्रिया दत्त दिवंगत खासदार व अभिनेते सुनील दत्त यांची मुलगी आहे. सुनील दत्तबाबत बॉलिवूडमध्ये आदराचे स्थान होते व आहे. त्यामुळे त्यांच्या नावावर प्रिया दत्त मुंबईतून सहज निवडून येते असा अनुभव आहे. त्यासाठीच भाजपला बॉलिवूडमधील कलाकार हवा होता, जेणेकरून ही मते विभागली जातील व भाजपला विजयाची संधी प्राप्त होईल. त्यासाठीच भाजप नेत्यांनी नानाला गळ घातली आहे. त्याआधी भाजपने अभिनेता अनुपम खेर यांच्याकडे विचारपूस केली होती. मात्र, खेर यांनी नकार दिला होता. दरम्यान, खेर यांना आपकडून उमेदवारीसाठी विचारपूस होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अशा स्थितीत उत्तर-मध्य मुंबईतून प्रिया दत्त-नाना पाटेकर- अनुपम खेर अशी लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.