Home | Maharashtra | Mumbai | nanded election analaysis

विश्लेषण: काँग्रेसला 'छप्पर फाडके' यश, अशोक चव्हाणांच्या विराट विजयाचे गुपित काय?

अजय गोरड | Update - Oct 13, 2017, 10:04 AM IST

नांदेड महापालिकेच्या इतिहासात काँग्रेसला प्रथमच इतका विशाल विजय मिळवता आला.

 • nanded election analaysis
  मुंबई- नांदेड महानगरपालिकेचे निकाल आले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व खासदार अशोक चव्हाण यांनी या निवडणुकीत 'न भूतो ना भविष्यति' असे यश संपादन केले. 81 जागांपैकी तब्बल 70 हून अधिक जागा खिशात घातल्या. नांदेड महापालिकेच्या इतिहासात काँग्रेसला प्रथमच इतका विशाल विजय मिळवता आला. नांदेडात काँग्रेसला 1997 मध्ये 65 पैकी 28 जागा, 2002 मध्ये 73 पैकी 21, 2007 मध्ये 73 पैकी 37 तर 2012 मध्ये 81 पैकी 40 जागा मिळाल्या होत्या. या निवडणुकीत तर त्यांच्यासमोर भाजपचे भले मोठे आव्हान होते. याचमुळे अशोक चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. भाजपचा अश्वमेध मागील दोन-तीन वर्षापासून चौफेर असा उधळत होता. त्यामुळे भाजप अशोक चव्हाणांनाही घरच्या मैदानात धोबीपछाड देणार का याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष होते. मात्र, चव्हाणांनी भाजपचे हे आव्हान सहज परतावून लावले व अपेक्षेहून मोठा विजय खेचून आणला. काँग्रेस पक्षाला व खुद्द अशोक चव्हाण यांना 50 च्या आसपास जागांचा अंदाज होता. मात्र, तेथे काँग्रेसला छप्पर फाडके यश मिळाले.
  नांदेडमधील काँग्रेसच्या या यशामागे अशोक चव्हाण यांनी मागील पाच-सहा महिन्यापासून घेतलेली मेहनत कामाला आली. विशेष म्हणजे समोरच्या शत्रूचा अंदाज असल्याने त्यांनी रणनिती आखली आणि यशस्वी करून दाखवली. अशोकरावांना भाजपचे आव्हान परतावून लावायचे होते पण पक्षांतर्गत विरोधकांना खासकरून काँग्रेस सोडलेल्या राणेंना आपली ताकद दाखवून द्यायची होती. नांदेडमध्ये मोठे यश मिळवून अशोक चव्हाणांनी सर्वांनाच धोबीपछाड दिला आहे.
  नांदेडमध्ये काँग्रेसला यश मिळवून देताना चव्हाणांनी एका दगडात अनेक पक्षी गारद केले आहेत. नोटबंदी, जीएसटीसारख्या राष्ट्रीय पातळीवरील मुद्यांचा व सरकारविरोधी रोषाचा काँग्रेसला काही प्रमाणात फायदा झाला असला तरी अशोक चव्हाणांच्या रणनितीचा हा विजय असल्याचे मान्य करावे लागेल. एमआयएमला निष्प्रभ करणे, मुस्लिम-दलित-पंजाबी मतांची एकजूट करणे, भाजपच्या डावपेचांना पुरून उरणे, मुख्यमंत्र्यांची प्रचार व एकूनच रणनिती फसणे, त्यांचे अशोक चव्हाणांवर वैयक्तिक पातळीवर टीका करणे आदी मुद्दे अशोक चव्हाणांना मोठे यश देऊन गेले.
  पुढे स्लाईडद्वारे पाहा, कोणत्या कोणत्या मुद्यामुळे अशोक चव्हाण यांनी एवढा मोठा विजय मिळवला...
 • nanded election analaysis
  एमआमएमला निष्प्रभ केले- 
   
  नांदेडमधील काँग्रेसच्या आजच्या विजयात सर्वात मोठा फॅक्टर ठरला तो मुस्लिम मते व एमआयएम फॅक्टर. 2012 साली झालेल्या पालिका निवडणुकीत एमआयएमचे तब्बल 13 नगरसेवक निवडून आले. 12 टक्के मतेही खाल्ली. यामुळे काँग्रेसचा जनाधार कमी झाला. नांदेड शहरात 30 टक्क्यांच्या आसपास मुस्लिम लोकसंख्या आहेत. पहिल्याच निवडणुकीत एमआयएमचे एका रात्रीत 13 नगरसेवक निवडून आल्यानंतर पहिला धक्का काँग्रेसला बसला होता. कारण मुस्लिम समुदाय काँग्रेसचा पारंपारिक मतदार होता. मात्र, 2012 च्या दरम्यान केंद्रात आणि राज्यात काँग्रेसचे सरकार होते. त्यामुळे मुस्लिमांचा काँग्रेसवर त्यावेळी राग होता. याचा फायदा एमआयएमने तेव्हा अलगद उचलला. तो अनुभव लक्षात घेऊन अशोक चव्हाणांनी मागील काही काळापासून एमआयएम पक्षाला पोखरणे सुरु केले. एमआयएमच्या सहा नगरसेवकांना काँग्रेस पक्षात घेऊन बेरजेचे राजकारण केले. सोबत यंदा 81 पैकी तब्बल 24 मुस्लिमांना उमेदवारी दिली. विशेष म्हणजे आज हे सर्व 24 मुस्लिम उमेदवार निवडून आले आहेत. परिणामी मुस्लिमांनी एमआयएमऐवजी काँग्रेसला मतदान केले आणि त्याचा एकत्रित परिणाम आजच्या निकालात दिसून आला. मुस्लिम मतांच्या जोडीला पंजाबी-दलित मतांची साथ काँग्रेसला मिळाली आणि अशोकरावांचे काम सोपे झाले.
 • nanded election analaysis
  भाजपची रणनिती फसली-
   
  भाजप गेली काही दोन-तीन वर्षे सर्व मोठ्या निवडणुका जिंकत आला आहे. इतर पक्षांतील मातब्बर नेत्याला गळाला लावून आपल्या पक्षात घ्यायचे. त्यांना आर्थिक रसद पुरवायची. त्या त्या स्थानिक पण ताकदीच्या विरोधी नेत्यांवर वेगवेगळे शिंतोडे उडवायचे व जनमानसात त्याची प्रतिमा मलिन करायची आणि सत्ता हस्तगत करायची हे त्यांचे धोरण. यावर्षी झालेल्या महापालिका निवडणुकीत दिसून आले होते. तोच फॉर्म्यूला भाजपने येथेही वापरला. शिवसेनेचे आमदार प्रताप चिखलीकर-पाटील यांना फोडले. सोबत राष्ट्रवादीसह सेना व काँग्रेसमधील नगरसेवक फोडून पक्षात प्रवेश दिला. मंत्री संभाजी निलंगेकर आणि चिखलीकर यांच्याकडे निवडणुकीचे सूत्रे देऊन आक्रमक प्रचार यंत्रणा राबवली. चिखलीकर हे मूळात ग्रामीण नांदेडमधील त्यातही बाहेरचे (शिवसेनेचे) उसणे. त्यामुळे शहरातील भाजप नाते नाराज झाले. अर्थात नांदेड शहरात भाजपकडे सक्षम चेहरा व नेतृत्त्व नव्हते त्याचमुळे भाजपला जिल्ह्यातील व ग्रामीण भागातील चिखलीकरांना व बाहेरच्या जिल्ह्यातील निलंगेकरांना पुढे करावे लागले. त्यातच तिकीट वाटपातही मोठा घोळ झाला. मूळच्या भाजपवाल्यांना केवळ 7 तिकीटे दिली तर बाहेरून आलेल्या आय-या-गय-यांना 70-75 लोकांना तिकीट दिली आणि भाजपता इथेच घात झाला. भाजपकडून लढणा-या दलबदलू नगरसेवकांना लोकांनी हारविले.
 • nanded election analaysis
  भाजपचा खालच्या पातळीवरील प्रचार-
   
  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशोक चव्हाणांवर वैयक्तिक व खालच्या पातळीवर टीका केली. अशोकरावांच्या दोन पिढ्यांनी काहीही केले नाही असे मुख्यमंत्री म्हणाले. मात्र, नांदेड शहर आज जे काही आहे केवळ चव्हाण पिता-पुत्रामुळेच. दोन वर्षापूर्वी राज्यात खासकरून मराठवाड्यात भीषण दुष्काळ होता. सांगलीतून बीड, लातूरला रेल्वेने पाणी नेले पण नांदेडात चव्हाण कुटुंबांच्या दूरदृष्टीमुळे नांदेडकरांचा पाण्याचा प्रश्न भेडसावला नाही. त्यामुळे शहरी लोकांनी चव्हाणांच्या कामालाच पसंती दिली. फडणवीस यांनी ग्रामीण भागात शेतक-यांसमोर जसे भाषण केले जाते व लोकांना ते पटते त्या प्रकारातील भाषण केले. आदर्श प्रकरणाचीही उदाहरणे दिली. आदर्श घोटाळा प्रकरण हे एक सामूदायिक भ्रष्टाचाराचे उदाहरण होते. मात्र, अशोकरावांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले. त्यावेळी त्यांच्यावर अन्याय झाला अशी भावना नांदेडकरांमध्ये होती किंवा आजही काही प्रमाणात आहे. फडणवीसांनी पुन्हा त्या जखमेवर पुन्हा मीठ चोळले. त्यांच्या नातेवाईकांच्या फ्लॅटबाबत चुकीची माहिती दिली. एकूनच नांदेडकरांनी भाजपच्या खालच्या स्तरातील टीकेला स्वीकारले नाही.
 • nanded election analaysis
  अशोक चव्हाणांचा करिष्मा कायम-
   
  नांदेड म्हटले की आपसूकच अशोक चव्हाण हे नाव समोर येते. आज त्यांच्या करिष्मामुळेच तेथे काँग्रेस जिंकला हे मान्य करावे लागेल. अशोक चव्हाण हे माजी मुख्यमंत्री आहेत. राज्यात काम करण्याचा त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे. वडिल पक्के काँग्रेसी नेते राहिले. केंद्रात गृहमंत्रीपद, राज्यात मुख्यमंत्रीपद भूषविले. या दरम्यान त्यांनी नांदेड व परिसराचा जेवढे विकास करता येईल तेवढे केले. त्यामुळे पहिल्यापासून सर्वजण चव्हाण कुटुंबियांचे नेतृत्त्व मानत आले. अशोक चव्हाण यांनीही आपल्या पित्याचा वारसा पुढे नेण्यावर दिला. साहजिकच त्यांचे नेतृत्त्व उजळून निघाले. आजच्या निकालाने नांदेड शहरात अशोक चव्हाणांचा दबदबा व करिष्मा कायम असल्याचे सिद्ध झाले.
 • nanded election analaysis
  अशोकरावांना स्वत:ला सिद्ध करून दाखवायचे होते-
   
  अशोक चव्हाण हे मोठ्या राजकीय घराण्यातून आलेले नेते आहेत. याचा त्यांना जसा फायदा झाला तसा तोटाही झाला. वडिलांच्या काँग्रेसनिष्ठेने त्यांना केंद्रातील गृहमंत्री ते राज्यातील मुख्यमंत्री होता आले. अशोक चव्हाणांनाही 2008 मध्ये संधी मिळाली. मात्र, 2010 साली आदर्श प्रकरण बाहेर आले आणि अशोक चव्हाणांची पुरती लक्तरे निघाली. मुख्यमंत्रीपद गमवावे लागले सोबत त्यांची मोठी अब्रू वेशीवर टांगली गेली. मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाल्यावर ते राजकारणाच्या परिघाबाहेर फेकले गेले. मात्र, पुढे मोदी लाटेत निवडून येत स्वत:ला सिद्ध केले. राज्यात काँग्रेसचे एक एक असे गड ढासळत होते तर भाजप एक एक बालेकिल्ला पादाक्रांत करत चालला होता. लोकसभा, विधानसभा, मोठ्या शहरातील बहुतेक महानगरपालिका भाजपने ताब्यात घेतल्या. आता नांदेडची वेळ होती. त्यामुळे भाजपला रोखण्याचे मोठे कठिण काम अशोक चव्हाणांपुढे होते. सोबत नुकतेच काँग्रेस सोडून गेलेल्या नारायण राणेंनी चव्हाणांवर राजकीय हल्ले केले. चव्हाणांची ताकद काय?, जिल्हा परिषद तरी ताब्यात ठेवता येते का अशा ढुसण्या दिल्या. आज जर चव्हाण नांदेड निवडणूक हारले असते तर नारायण राणे जे बोलत होते त्याला बळ मिळाले असते व पक्षांतर्गत दबाव अशोक चव्हाणांवर वाढला असता. त्यामुळे काहीही करून अशोक चव्हाणांना ही निवडणूक जिंकणे क्रमप्राप्त होते. यात ते यशस्वी झाले व स्वत:ला सिद्धही करू शकले.

Trending