Home »Maharashtra »Marathwada »Other Marathwada» Nanded Mahanagarpalika Result Live

नांदेडमध्‍ये ‘अशोक’पर्व कायम; 81 पैकी 70 जागा! महापालिकेत काँग्रेसचा विक्रमी विजय

नांदेड महापालिकेत ८१ जागांपैकी ७० जागा जिंकून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने एकहाती सत्ता

विलास इंगळे | Oct 13, 2017, 09:58 AM IST

नांदेड-नांदेड महापालिकेत ८१ जागांपैकी ७० जागा जिंकून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवली. नगरसेवकांची फोडाफोडी करून भाजपने ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळे मतदार कुणाला कौल देणार याबाबत उत्सुकता होती. मात्र, फोडाफोडीचे राजकारण करून भाजपने मांडलेली मतांची गणिते चुकली आणि पक्षाला केवळ ५ जागांवर समाधान मानावे लागले. दुसरीकडे पूर्वी १० जागा असलेल्या राष्ट्रवादीला भोपळाही फोडता आला नाही. १४ जागा असलेली शिवसेना ३ जागा घेत औषधापुरतीच उरली. पूर्वी ११ जागा असलेल्या एमआयएमचे तर यंदा अस्तित्वच राहिले नाही. भाजपच्या जागा २ वरून कशाबशा ५ झाल्या. राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर झालेल्या विविध निवडणुकांमध्ये भाजपने मिळवलेल्या यशाची तुलना करता नांदेडमध्ये मतदारांनी भाजपला अव्हेरल्याचेच चित्र आहे.

मुख्यमंत्र्यांसह डझनभर मंत्र्यांचा ताफा
नांदेडची महापालिका ताब्यात घ्यायची या इराद्याने भाजपने जवळपास डझनभर मंत्री आघाडीवर लावले होते. कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर व भाजपचे सरचिटणीस व आमदार सुजितसिंह
ठाकूर यांच्याकडे येथील प्रचाराची सूत्रे देण्यात आली होती. त्यांच्या जोडीला शिवसेनेत राहून भाजपचा प्रचार करण्यासाठी आ. प्रताप पाटील चिखलीकर हे होते.

याबरोबरच प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मंत्री पंकजा मुंडे, मंत्री गिरीष महाजन, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार, गुरूद्वारा बोर्डाचे अध्यक्ष सरदार तारासिंह, आ. सुधाकर भालेराव, तुषार राठोड आदी भाजपचे मंत्री, आमदार, पदाधिकारी यांनी कंबर कसली होती. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दोन सभा घेतल्या होत्या.
भाजपने उतरवले होते १५ आयात नगरसेवक
या निवडणुकीत भाजपने काँग्रेससह शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक फोडून चांगलाच जोर लावला होता. मागील वेळी केवळ दोन जागा जिंकणाऱ्या भाजपमध्ये काँग्रेससह जवळपास १५ विद्यमान नगरसेवकांनी प्रवेश केल्याने त्यांना भाजपने तिकीट देवून निवडणुकीत उतरवले होते. काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांचा मुलगा नवल पोकर्णा, आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे पुतणे संदीप चिखलीकर, माजी महापौर सुधाकर पांढरे यांची मुलगी, दिलीप कंदकुर्ते यांचा मुलगा, माजी विरोधी पक्षनेते बाळू खोमणे यांचा समावेश आहे.
सेना काँग्रेसची बी टीम
शिवसेना काँग्रेसची बी टीम आहे. त्यांचे उमेदवार विजयासाठी नाहीत तर भाजपच्या पराभवासाठी उभे आहेत, असा आरोप खुद्द मुख्यमंत्र्यांनी केल्याने सेनेत चांगलीच खळबळ माजली. फडणवीसांच्या या आरोपामुळे शिवसेना-भाजपात चांगलीच जुंपली. त्याचा परिणाम काँग्रेसविरोधी मतामध्ये विभाजन होण्यात झाला. परिणामी सेना व भाजप दोघेही गारद झाले. काँग्रेसला मुस्लीमेतर प्रभागातही विजय मिळविणे सोपे झाले.
राणेंकडून अभिनंदन
अशाेक चव्हाणांवर टीका करत काँग्रेसमधून बाहेर पडलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी या निकालानंतर मात्र चव्हाणांचे अभिनंदन केले. चव्हाण यांनीही पत्रकार परिषदेत त्याचा स्वीकार केला. काँग्रेसमधून बाहेर पडताना अापणही राणेंना शुभेच्छा दिल्या हाेत्या, याकडे त्यांनी लक्ष वेधले. भाजपचा अाता परतीचा प्रवास सुरू झाला अाहे, असे चव्हाण म्हणाले.
अशोक चव्हाणांनी गड राखला-
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची या निकालाच्या निमित्ताने प्रतिष्ठा पणाला लागली होती. मोदी लाटेतही खासदार म्हणून निवडून आलेल्या अशोक चव्हाण यांनी मात्र आज पुन्हा एकदा नांदेड महापालिकेच्या निकालाच्या निमित्ताने आपली ताकत दाखवून दिली आहे. अशोक चव्हाण यांनी व्यूहरचना आखीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धोबीपछाड दिला आहे. एमआयएम, शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीच्या मतविभाजनाचा फायदा काँग्रेसला झाला आहे.
मुख्यमंत्र्यांना धोबीपछाड-
भाजपने नांदेड महापालिकेसाठी काँग्रेस, शिवसेनेसह राष्ट्रवादीचे लोक आपल्या पक्षात घेत बेरजेचे राजकारण केले आहे. मात्र, त्याला नांदेडकरांनी बिलकूल प्रतिसाद दिल्याचे दिसत नाही. भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली. यासाठी शिवसेनेचे आमदार प्रताप चिखलीकर-पाटील यांना फोडले. सोबत मराठा कार्ड खेळत संभाजी निलंगेकर यांच्याद्वारे तेथे रसद पोहचवली. मात्र, नांदेडकरांनी त्यांना थारा दिला नाही.
एमआयएमचा सुपडा साफ-
एमआयएमने 2012 साली झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत तब्बल 12 टक्के मते घेतली होती. तसेच त्यांचे त्यावेळी 12 नगरसेवक निवडून आले होते. यंदा मात्र, तेथील मुस्लिम मतदारांनी एमआएमलाही साफ नाकारल्याचे दिसत आहे. या निवडणुकीत औवेसी बंधूंनी चार दिवस नांदेडमध्ये तळ ठोकला होता. मात्र, त्याचा काहीही फायदा त्यांच्या पक्षाला झालेला दिसत नाही.
शिवसेना- राष्ट्रवादीचे पानीपत-
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला नांदेड महापालिकेत खातेही खोलता आलेले नाही. त्यामुळे नांदेडकरांनी सेना- राष्ट्रवादीचे पानीपत केल्याचे चित्र आहे.
पुढे स्लाईडद्वारे पाहा, इतर पक्षांची का झाली वाताहात.....

Next Article

Recommended