आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र भूषण वादात राणेंची उडी, म्हणाले- \'पुरंदरेंचे नागरी सत्कार पिंजऱ्यात होतील\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल राज्यात होणारे त्यांचे नागरी सत्कार उधळून लावले जातील असे संकेत माजी मंत्री आणि काँग्रेस नेते नारायण राणे यांनी दिले आहेत. पुरंदरे यांना राज्य शासनाच्या वतीने बुधवारी राजभवनातील छोटेखानी कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. यामुळे मराठा समाज नाराज असल्याचे राणे म्हणाले.

पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांनी, बाबासाहेब पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण मिळाल्याबद्दल विविध ठिकाणी नागरी सत्कार होतील असे म्हटले होते. त्या पार्श्वभूमीवर राणेंनी हे सत्कार पिंजऱ्यात होतील असे सांगत, कार्यक्रम उधळून लावले जातील याचे संकेत दिले आहेत.
मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत राणे म्हणाले, पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण मिळाल्यामुळे मराठा आणि बहुजन समाज नाराज आहे. तो हे कधीच खपवून घेणार नाही. राज्य सरकारवर टीका करताना नारायण राणे म्हणाले, दुष्काळी परिस्थितीवरुन जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी पुरंदरेंना पुरस्कार देण्यात आला. फडणवीस सरकार राज्यात जातीय भींती उभ्या करुन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम करत आहे.
डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येला आज (गुरुवार) दोन वर्षे पूर्ण झाली मात्र अद्याप त्यांच्यावर हल्ला करणाऱ्यांपर्यंत पोलिस पोहोचू शकलेले नाही. सरकार दाभोलकरांच्या खून्यांना राजकीय संरक्षण देत आहे, असाही आरोप त्यांनी केला.