आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नारायण राणे दिसतोय तो बाळासाहेबांमुळे, पासष्टीच्या सोहळ्यात राणेंनी व्यक्त केली कृतज्ञता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नारायण राणेंच्या 65 व्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात उपस्थित मान्यवर. - Divya Marathi
नारायण राणेंच्या 65 व्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात उपस्थित मान्यवर.
मुंबई- मला मुंबईचा महापौर व्हायचे होते तेव्हा बाळासाहेबांनी मला आमदारकीचे तिकीट दिले. बाळासाहेबांनी जसा विश्वास टाकला तसा कोणी टाकणार नाही. नाहीतर हा नोकरदार कोकणी माणूस महाराष्ट्राला कधी दिसलाच नसता. मी आज जो काही आहे, तो केवळ बाळासाहेबांमुळेच, अशा शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी जाहीर कृतज्ञता व्यक्त केली.    

राणे यांच्या पासष्टीचा सोहळा रविवारी मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिरात दिमाखात पार पडला. त्या वेळी ते बोलत होते. या सोहळ्याला काँग्रेसह भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील दिग्गज नेत्यांनी उपस्थिती होती. राणेंनी या वेळी गडकरींची स्तुती केली, गोपीनाथ मुंडे-प्रमोद महाजन यांच्या आठवणींनाही उजाळा दिला.

राणे म्हणाले: मी काँग्रेसमध्ये आहे, तरीही नितीन गडकरी आले. विरोधी पक्षातील नेत्यासोबत बसताना अनेकांची घाबरगुंडी उडते. ती भीती गडकरींना वाटत नाही. पद धोक्यात घालून मैत्री निभावणे नितीन यांनाच जमते.

बाळासाहेब यांच्याशी मी जसा बोलायचो, तसाच आज सोनिया गांधी आणि राहुल यांच्याशी संवाद साधतो. मी कोणत्या पक्षात जाणार याची आज मीडियाला अधिक चिंता आहे.
 
राणेंनी शिवसेना साेडली नसती, तर अाज राजकारण वेगळे असते; नितीन गडकरी यांचा दावा
‘राणेसाहेब आणि मी दोघेही विरोधी पक्षनेत्याची भूमिका बजावायचो. कोणतीही पार्श्वभूमी नसताना नारायण राणेंनी मुंबईत नेतृत्व उभे केले. राजकारणात राणेंचे व्यक्तिमत्त्व ‘सेल्फ मेड’ आहे. पक्ष बदलल्यानंतर माणसे रंग बदलतात. मात्र, शिवसेना सोडल्यानंतर राणेंनी कधीही बाळासाहेबांचा अनादर केला नाही. तिकडून कितीही टीका झाली तरी त्यांनी कधीही अनादर होईल असे वक्तव्य केले नाही. शिवसेना सोडल्यानंतर सिद्ध झाले की, राणे यांचे नेतृत्व पक्षापलीकडचे आहे. राणे यांनी शिवसेना सोडली नसती तर आजचे महाराष्ट्राचे राजकारण वेगळ्या दिशेने गेले असते,’ असा दावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी केला.  

नारायण राणे यांच्या पासष्टीनिमित्त रविवारी मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिरात अायाेजित सत्कार साेहळ्यात ते बाेलत हाेते. या वेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांच्यासह काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसमधील  प्रमुख नेत्यांची उपस्थिती हाेती. या कार्यक्रमात सर्वच पक्षीय नेत्यांनी राणेंच्या नेतृत्वगुणाचे काैतुक केले.  

केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले, ‘बेस्ट’मध्ये अनेक चेअरमन होऊन गेले, पण चेअरमन म्हणून कारकीर्द लक्षात राहिली ती राणेंची.  बाळासाहेब मला एकदा म्हणाले होते, ‘नवलकर, डाके भाजपमध्ये घेऊन जा आणि तू शिवसेनेत ये. तू भाजपच्या लायकीचा नाहीस आणि हे शिवसेनेच्या लायकीचे नाहीत.’ गडकरींनी असे सांगताच सभागृहात एकच हशा पिकला.  

राणेंच्या काँग्रेस प्रवेशाबाबतची अाठवण सांगताना गडकरी म्हणाले, ‘खरे तर त्या वेळी  मी राणेंना काँग्रेसमध्ये जाताना म्हटले होते, तुम्ही आगीतून सुटून फुफाट्यात जाताय. सुशीलकुमार शिंदेंना ठाऊक आहे की, हायकमांड हसले की आपल्यालाही हसावे लागते. पण हा स्वभाव राणेंचा नाही. माणूस जेव्हा लढाईत हरतो तेव्हा तो पराभूत होत नाही. तो युद्धभूमी सोडून जातो तेव्हा हरतो. हे वाक्य राणे यांच्यासाठी िफट्ट आहे,’ असे गाैरवाेद‌्गारही गडकरींनी काढले.  

विरोधी पक्षनेत्याने शिवलेला काेट घालून मी बजेट मांडले : पाटील  
‘एकदा मी बरेचसे वजन कमी केले होते. त्यामुळे सर्वच कपडे सैल येत हाेते. त्या वर्षी तर अर्थसंकल्प मांडण्यासाठीही मला व्यवस्थित होणारे कपडे नव्हते. योगायोगाने राणे साहेबांना हे कळले. माझ्याकडे माप घेणारा माणूस त्यांनी पाठवला.  दुसऱ्या दिवशी ११ वाजता नवा काेटही  शिवून आला. त्या वेळी विरोधी पक्ष नेत्याने दिलेला सूट घालून मी अर्थसंकल्प मांडला,’ असा किस्सा जयंत पाटील यांनी सांगितला.  

राणे, कुठेही जा पण रुबाब घालवू नका : निंबाळकर  
सुशीलकुमार शिंदे म्हणाले, ‘एखाद्याला छळल्यानंतर ताे माणूस काय करतो याकडे काँग्रेस नेतृत्वाचे बारीक लक्ष असते. राणे  या परीक्षेत यशस्वी झाले आहेत. अभ्यासपूर्ण भाषणे ही राणेंची खासियत.  तरुण आमदारांनी राणेंचा आदर्श घ्यायला हवा.  राणे यांच्याबाबत फार अफवा आहेत, ते इकडे चालले, तिकडे चालले. पण ते द्रष्टे आहेत. वेडावाकडा विचार करणार नाहीत,’ असा टाेला राणेंच्या भाजप प्रवेशाबाबत उठलेल्या चर्चेचा संदर्भ देत शिंदेंनी लगावला. ‘राणे साहेबांचा स्पष्टवक्तेपणा काही पक्षांमध्ये मानवणारा आहे. पण ते ज्या पक्षात गेलेत तेथे त्यांची कुचंबणा होत असणार,’ असा चिमटा राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांनी काढला.   तर ‘राणे साहेब, कुठेही जा, पण रुबाब घालवू नका’ असा सल्ला विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक  निंबाळकर यांनी दिला.   
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, कार्यक्रमाचे फोटो...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...