आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मत विभागणीसाठी आणलेला ‘एमआयएम’ पक्ष हे भाजपचे पिल्लू : राणे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘मुस्लिम मतांच्या विभाजनासाठी आणलेला एमआयएम पक्ष म्हणजे भाजपने जन्मास घातलेले पिल्लू आहे. मागच्या निवडणुकीत हा पक्ष नसता तर काँग्रेसचे अनेक खासदार निवडून आले असते,’ अशी टीका माजी मुख्यमंत्री व वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील काँग्रेस उमेदवार नारायण राणे यांनी रविवारी केली. त्याबरोबरच ‘शेपटीवर पाय द्याल तर खपवून घेणार नाही,’ असा गंभीर इशाराही त्यांनी विरोधकांना दिला.
वांद्रे मतदारसंघातील काँग्रेसच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन पक्षाचे प्रभारी मोहन प्रकाश व माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार यांच्यासह अनेक नेत्यांच्या उपस्थितीत रविवारी झाले. यानंतर खेरवाडी येथील जाहीर सभेत राणे बोलत होते.

‘गेली २२ वर्षे शिवसेनेची मुंबई महापालिकेत सत्ता आहे. मात्र, या पक्षाने मुंबईचा विकास केला नाही. समस्या सोडवल्या नाहीत. शिवसेना-भाजप हे पक्ष केवळ भावनेच्या प्रश्नांवर निवडणुका लढवतात,’ असा आरोपही त्यांनी केला.‘२५ वर्षांपूर्वी मी कोकणात गेलो. तेव्हा सिंधुदुर्ग मागासलेला जिल्हा म्हणून ओळखला जात होता. आमदार झाल्यावर सिंधुदुर्गच्या विकासाचा मी चंग बांधला. कोकणात आता जाऊन पाहा,
विकास कशाला म्हणतात ते तुम्हाला दिसेल? जसे कोकणचे प्रश्न होते तसे वांद्रेचे प्रश्न आहेत. ते सोडवण्यासाठी माझ्यासारख्या आक्रमक आमदाराची गरज आहे. तुम्ही मला इथे एकदा संधी द्या. तुमच्या जीवनात परिवर्तन घडवून दाखवितो’, अशी ग्वाही राणे यांनी दिली. या मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवार तृप्ती सावंत आणि काँग्रेसचे नारायण राणे यांच्यात ११ एप्रिल रोजी थेट लढत होत आहे.