आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narayan Rane Fielded In Mumbai Bypolls Only To Stop MIM Chariot In Maharshtra

एमआयएमने राणेंच्या विरोधात ठोकले शड्डू, ओवेसी बंधूंसह औरंगाबादचे आमदार जलील वांद्र्यात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - वांद्र्याची पोटनिवडणूक नारायण राणे यांनी जशी प्रतिष्ठेची केली आहे, तशीच ती एमआयएमने केली असून राणेंपेक्षा किमान एक मत तरी जास्त घेण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. यासाठी एमआयएमचे संस्थापक ओवेसी बंधूंसह हैदराबादचे आमदार, नांदेडचे नगरसेवक तसेच भायखळा व औरंगाबादचे आमदार वांद्र्यात तळ ठोकून आहेत.

वांद्र्याची पोटनिवडणूक एमआयएमने अस्तित्वाचा प्रश्न केला असून ही निवडणूक म्हणजे औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीसाठी रंगीत तालीम असणार आहे. महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाला, विशेषत: या समाजातील तरुण वर्गाला असलेले या पक्षाचे आकर्षण कायम राहावे, यासाठी ओवेसी बंधू ही जागा जिंकण्यासाठी वांद्रे पूर्वचा मुस्लिमबहुल भाग पिंजून काढत आहेत. बेहरामपाडा, भारतनगर परिसरात मुस्लिम मतांची संख्या सुमारे ८० हजार असून ही मते आपल्या बाजूने खेचून आणण्यासाठी ओवेसी बंधूंनी सभांचा धडाका लावला आहे.
ऑक्टोबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात एमआयएमचे उमेदवार सिराज खान यांना २३,९७६ मते मिळाली होती. ओवेसींनी या वेळीही दिराज यांनाच उमदेवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. ओवेसींनी उमेदवार देऊ नये, यासाठी राणेंनी खूप प्रयत्न केले होते. हैदराबादला त्यांची माणसेही गेली होती, अशी सूत्रांची माहिती आहे. शिवसेना व भाजपला रोखायचे असेल तर अल्पसंख्याक मतांची विभागणी होता कामा नये, असे भावनिक आवाहन राणेंनी ओवेसींना केले होते. मात्र, काँग्रेसला अल्पसंख्याकांचा एवढाच पुळका वाटत असेल तर त्यांनीच माघार घेऊन एमआयएमला पाठिंबा द्यावा, असे सुनावल्यानंतर राणेंनी काँग्रेसचे नसीम खान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक या काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मदतीसह मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला.

ओवेसी बंधूंनी प्रचाराचा धडाका लावताना काँग्रेसने मुस्लिमांचा मतांसाठी कसा वापर केला, त्याचबरोबर रद्द झालेले मुस्लिम आरक्षण तसेच गोवंश हत्याबंदीचा निर्णय होताना काँग्रेस हातावर हात घेऊन बसली, असा आरोपही त्यांनी केला.
राणे-सेनेत आरोप-प्रत्यारोप

नारायण राणे या निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेवर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. मुंबई महापालिका म्हणजे ठाकरेंचे उदरनिर्वाहाचे साधन, असा आरोप राणेंनी केल्यानंतर त्याला शिवसेनेकडून तसेच प्रत्युत्तर देण्यात आले. राणेंकडे जुहूत आठमजली इमारत आली कुठून? हा जादूचा का तेलगीचा पैसा आहे, अशी बोचरी टीका शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केली.