मुंबई - काँग्रेसमध्येच राहून मुख्यमंत्री व पक्षश्रेष्ठींना आव्हान देणारे उद्योगमंत्री नारायण राणेंचे पक्षाविरोधातील बंड अखेर पंधरा दिवसांत थंड झाले. आपल्या मुलांच्या राजकीय भविष्यासाठी राणेंनी नमती भूमिका घेतल्याचे समोर आले आहे. धाकटा मुलगा नितेशला विधानसभेची उमेदवारी आणि लोकसभेला पराभूत झालेल्या नीलेशचा राज्यसभेसाठी विचार करण्याचे आश्वासन मिळाल्याने राणेंनी काँग्रेसमध्येच राहण्याचा निर्णय घेतला आहे.
राणे मुख्यमंत्री होण्यासाठीच काँग्रेसमध्ये आले होते आणि ही बाब त्यांनी कधीच लपवून ठेवली नाही. यामुळेच 2005 तसेच 2008 मध्ये त्यांनी विलासराव देशमुख तसेच अशोक चव्हाण यांना लक्ष्य करत पक्षश्रेष्ठींवरही टीका केली. मात्र, सत्तेच्या प्रेमापोटी त्यांनी कॉँग्रेस सोडली नव्हती. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत कॉँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर पक्षश्रेष्ठी पृथ्वीराज चव्हाण यांना बदलून आपल्याला मुख्यमंत्री करतील, अशी राणेंना आशा होती. यासाठी त्यांनी जोरदार प्रयत्न केले. मुख्यमंत्र्यांवर टीका करण्याची संधी सोडली नाही. मात्र, पक्षश्रेष्ठींनी त्यांना दाद दिली नाही. त्यामुळे नारायण राणेंनी तिसर्यांदा बंडाचा झेंडा रोवला. मात्र, पदांची लालूच दाखवत काँग्रेसने यंदाही त्यांना थंड केले.
भाजपकडून ‘रेड सिग्नल’
राणेंनी गेल्या 15 दिवसांत भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. नितीन गडकरी तसेच अमित शहांशी संपर्कही साधला होता. त्यावर पक्षाध्यक्षांनी राज्यातील नेत्यांचेही मत जाणून घेतले. मात्र, उद्धव ठाकरे यांनी थेट युती तोडण्याची भाषा केल्याने भाजपने शिवसेनेची नाराजी न ओढवून घेण्याचा निर्णय घेतला. राज्यात महायुतीची सत्ता येण्याची शक्यता असताना शिवसेनेला दुखावून चालणार नाही, याचा विचार करून भाजपने राणेंना ‘रेड सिग्नल’ दाखवल्याचे सांगितले जाते.
नितेशला कणकवलीची जागा?
सिंधुदुर्ग जिल्ह्यातीला कुडाळ व कणकवली या दोन्ही जागा काँग्रेसच्या असून यापैकी कुडाळमधून 2009 मध्ये नारायण राणे निवडून आले होते. या वेळी ही जागा राणे लढवतील, असा अंदाज आहे, तर कणकवलीमधून नितेश यांना उभे करण्याचा प्रयत्न आहे. नितेशसाठी ते चेंबूरचाही पर्याय चाचपत आहेत, तर माजी खासदार नीलेश यांना राज्यसभेवर पाठवण्याची इच्छा आहे. नीलेश व नितेश या दोघांचे भविष्य निर्धास्त होत असेल तर आक्रमकतेला मुरड घालायला हवी, असा निर्णय घेऊन त्यांनी माघारीचा निर्णय घेतला.
स्वाभिमान ‘जागृत’ नाहीच, सर्मथकांनीही सोडली साथ
गेल्या 15 दिवसांत राणेंनी अनेक पर्याय चाचपून पाहिले. पहिला प्रयत्न होता तो धाकटा मुलगा नितेश राणेंच्या स्वाभिमानी संघटनेचे पक्षात रूपांतर करण्याचा. यासाठी नितेश खूप आग्रही होते. मात्र, स्वतंत्र पक्ष म्हणून आपली डाळ शिजणार नाही, हे लक्षात आल्याने त्यांनी हा प्रयत्न सोडून दिला. याच दरम्यान रवींद्र फाटक यांच्यासह काही सर्मथक सोडून गेल्याने राणेंना मोठा फटका बसला. मुलांकडून होणार्या सततच्या अपमानामुळे राणेंचा उजवा हात समजले जाणारे राजन तेलीही दूर झाल्याने कोकणात राणे डेंजर झोनमध्ये गेले.
उमेद खचल्याने ‘तह’
लोकसभा निवडणुकीतील यशामुळे शिवसेनेची ताकद वाढली. त्यातच राष्ट्रवादीचे माजी आमदार दीपक केसरकर यांनी आपल्यासोबत काही राणे सर्मथकांना शिवसेनेत नेले. त्यामुळे राणे अधिकच खचले. त्यामुळेच गुरुवारी सकाळपासून काँग्रेसचे प्रभारी मोहन प्रकाश व प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याशी राणेंनी तहाची बोलणी सुरू केली. दोघांनीही तुमच्या मुलांची भविष्यात काळजी घेतली जाईल, असे आश्वासन दिल्याने राणे शेवटी थंड झाले.
पुढे आणखी वाचा, उद्धव ठाकरे काय म्हटले राणेंबाबत...