आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राणेंना मंत्रिपद मिळाले तरीही शिवसेना सत्ता साेडणार नाही! शिवसेना नेत्यांची रणनीती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काँग्रेसमधून बाहेर पडत नारायण राणे यांनी रविवारी \'महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष\' या नव्या पक्षाची घोषणा केली. - Divya Marathi
काँग्रेसमधून बाहेर पडत नारायण राणे यांनी रविवारी \'महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष\' या नव्या पक्षाची घोषणा केली.
मुंबई- काँग्रेसला सोडचिट्ठी देऊन महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष काढणारे नारायण राणे यांना ‘एनडीए’त समाविष्ट करून फडणवीस सरकारमध्ये महत्त्वाचे मंत्रिपद देण्याची तयारी भाजपने केली अाहे. राणे व उद्धव ठाकरे यांच्यात विस्तवही जात नसल्याने भाजपच्या या निर्णयामुळे शिवसेनेत अस्वस्थता अाहे. अशा वेळी प्रसंगी शिवसेना सत्तेतूनही बाहेर पडेल अशीही राजकीय वर्तुळात चर्चा अाहे. मात्र सत्तेत राहूनच भाजपशी संघर्ष करण्याच्या निर्णयावर अाम्ही ठाम असल्याचे शिवसेनेतून सांगण्यात येते. केवळ राणेंना मंत्रिपद दिल्याने सत्तेतून बाहेर पडल्यास त्यांना फार महत्त्व दिल्यासारखे हाेईल. त्यामुळे राणेंकडे दुर्लक्ष करून सत्तेत राहण्याच्या निर्णयावर शिवसेना ठाम राहू शकते, अशी माहिती पक्षातील सूत्रांनी दिली.

दरम्यान, या चर्चेबाबत शिवसेना खासदार अरविंद सावंत यांना विचारले असता ‘राणे हा विषयच आमच्यासाठी महत्त्वाचा नाही,’ असे स्पष्ट करत या विषयावर अधिक बाेलणे टाळले.
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी दाेन दिवसांपूर्वी स्वाभिमान महाराष्ट्र पक्षाची घाेषणा केली. भाजपच्या सल्ल्यानुसारच त्यांची नवी राजकीय इनिंग सुरू असल्याचे राजकीय वर्तुळात सांगितले जाते. म्हणूनच दिवाळीपूर्वी किंवा नंतर त्यांना फडणवीस सरकारमध्ये महत्त्वाचे मंत्रिपद देऊन शिवसेनेला खिजवण्याचा प्रयत्नही भाजपकडून केला जाणार अाहे. राणेंना पद दिल्यास शिवसेनेचा थयथयाट हाेईल व अापसूकच ते सत्ता साेडतील, असा भाजपच्याही काही नेत्यांचा अंदाज अाहे. मात्र भाजपच्या या खेळीला अजिबात बळी पडणार नसल्याचे शिवसेनेतून सांगितले जाते.
 
सत्ता साेडल्यास शिवसेनेला फुटीचीही भीती
राजकीयदृृष्ट्या महत्त्व उरले नसलेल्या राणेंना मंत्रिमंडळात स्थान देऊन शिवसेनेला ‘चेक’ देण्याचा प्रयत्न भाजप करत अाहे. मात्र त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून सत्तेतच राहण्याचा निर्णय शिवसेनेने घेतलेला अाहे. गेल्या तीन वर्षांपासून भाजपसाेबत वाद हाेत असतानाही शिवसेनेने सत्ता साेडलेली नाही. अाता केवळ राणेंमुळे सत्ता साेडली तर अप्रत्यक्षपणे त्यांचे राजकीय महत्त्व वाढेल अाणि ते भाजपसाठी लाभदायक व शिवसेनेसाठी धाेकादायक ठरू शकते. त्यामुळे राणेंना फारसे महत्त्व न देता सत्तेत राहूनच भाजपशी  ‘दाेन हात’ करण्याची शिवसेनेची तयारी अाहे.
 
विधानसभा निवडणुकीला अाणखी दाेन वर्षे असताना सत्ता साेडण्यास शिवसेनेतील अनेक अामदार तयार नाहीत. तसेच मध्यावधीला सामाेरे जाण्याची त्यांची तयारी नाही. अशा परिस्थितीत भाजपशी फारकत घेतलीच तर शिवसेनेत फूट पडून अामदारांचा एक गट भाजपमध्ये जाऊ शकताे, त्यामुळे फडणवीस सरकार तरेल. हा धाेका माहीत असल्यामुळे काहीही झाले तरी सत्ता साेडणार नसल्याचे सूताेवाच उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यात केलेले अाहे, या निर्णयावरच ते ठाम राहतील, अशी शक्यता दिसते.
 
असंतुष्ट नेत्यांंकडून प्रतिसादच नाही; राणेंचा विदर्भ दौरा लांबणीवर
 महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्थापन करणारे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी नागपुरातून आपली पक्षसंघटना मोहीम सुरू करण्याची घोषणा केली होती. मात्र, चाचपणी केल्यावर विदर्भात फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचा अंदाज घेऊन राणे यांनी आपला दौरा लांबणीवर टाकल्याची चर्चा सुरू आहे.   

राणे समर्थक नेत्याने सांगितले की, ‘काँग्रेसचा राजीनामा दिल्यावर राणे यांनी त्यांच्यासोबत येण्यास इच्छुक नेत्यांचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला. काही नेत्यांशी त्यांनी चर्चा केली. मात्र विदर्भात प्रतिसाद मिळत नसल्याचा अंदाज घेऊन त्यांनी दौरा लांबणीवर टाकला.’ काँग्रेस व शिवसेनेच्या अनेक नेत्यांशी राणे यांच्याकडून संपर्काचे प्रयत्न झाले. पण एकाही बड्या अथवा पुरेसा जनाधार असलेल्या नेत्याने त्यांच्यासोबत येण्यास सहमती दर्शवली नाही,’ असेही सूत्रांनी सांगितले.
 
पुढे स्लाईडद्वारे वाचा, काय काय घडतेय पडद्यामागे... उद्धव ठाकरेंच्या विरोधात राणेंचा भाजप हत्यार म्हणून वापर करणार?....
बातम्या आणखी आहेत...