आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्री नारायण राणे यांचे ‘उद्योग’ थंड, काँग्रेस प्रचार समितीच्या अध्यक्षपदावर बोळवण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र- नारायण राणे पत्रकार परिषदेला संबोधित करताना.)
मुंबई - ‘काँग्रेसच्या पराभवाचा वाटेकरी होणार नाही’ अशी गर्जना करत काँग्रेसर्शेष्ठींना ठणकावणारे उद्योगमंत्री नारायण राणे यांच्यावर काँग्रेसच्या विजयासाठी बुधवारपासूनच मी राज्याचा दौरा करीन, असे म्हणण्याची नामुष्की ओढवली. काँग्रेस नेत्यांनी कानाडोळा केल्याने 15 दिवसांपूर्वी दाखवलेल्या आक्रमकतेला मुरड घालत राणे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा मागे घेत असल्याचे सांगून काँग्रेसमध्येच राहण्याचे स्पष्ट केले. राणेंची प्रचार समिती अध्यक्षपदावर बोळवण झाली आहे.

गेल्या दोन दिवसांत ज्येष्ठ नेत्यांशी झालेल्या चर्चेवर समाधानी असून, आपला योग्य तो सन्मान राखण्याची ग्वाही काँग्रेसने दिली आहे. त्यामुळे पक्ष सोडणार नाही, अशी घोषणा राणे यांनी केली. मंत्री म्हणून काम करणार असून, उद्यापासूनच राज्यभर काँग्रेसचा प्रचार सुरू करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मुंबईतील आपल्या ज्ञानेश्वरी या सरकारी निवासस्थानी राणे पत्रकारांशी बोलत होते. तत्पूर्वी, काँग्रेस नेते कृपाशंकर सिंह यांनी राणेंची त्यांच्या वांद्रय़ातील निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर दुपारी राणे हे मलबार हिलच्या सरकारी निवासस्थानी आले. तेथे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे व कृपाशंकर सिंह यांनी तासभर राणेंशी चर्चा करून त्यांचे मन वळवले. शिवाय काँग्रेसचे प्रभारी मोहन प्रकाश यांनीही दिवसभरात दोनदा फोनवरून चर्चा केल्याचा दावा राणे यांनी केला.

राणे यांचे घुमजावही : काँग्रेसचा पराभव होईल असे म्हणालोच नाही
काँग्रेसचा पराभव होईल असे आधी म्हणाला होतात, मग आता 15 दिवसांतच असे काय झाले की, काँग्रेस विजयी होण्याचा विश्वास आपल्याला वाटत आहे. या प्रश्नावर राणे यांनी पराभव होईल, असे कधी म्हणालोच नसल्याचे सांगत घुमजाव केले. चारही पक्षांना विजयाची समान संधी आहे. लोकांचा विश्वास जिंकेल तो विजयी होईल, असे राणे म्हणाले.
मागितले प्रदेशाध्यक्षपद, दिली प्रचार समितीची धुरा
निवडणुकीच्या काळापुरते म्हणजे तीन महिन्यांसाठी प्रदेशाध्यक्षपद हायकमांडकडे मागितले होते, असा खुलासा राणे यांनी केला.
अर्थ : राणेंना प्रचार समिती प्रमुख केल्याचे समजते. निवडणुकांतील परिणामांची जबाबदारी राणेंवर येईल. तिकीटवाटपातही अधिकार संदिग्धच असतील.

काँग्रेसचे दुर्लक्ष, तरीही सोनियांना भेटण्याचा दावा
सोनिया गांधी या आपल्या नेत्या आहेत. कधीही भेटण्याची मुभा त्यांनी मला दिली आहे. येत्या आठवडाभरात त्यांची भेट घेणार आहे, असे राणे यांनी या वेळी स्पष्ट केले.
अर्थ : नाराजीनंतर काँग्रेस नेत्यांनी सोनियांची भेट घडवून देण्याचे आश्वासन राणेंना दिले होते. त्यावर विचारता राणेंनी सावध उत्तर दिले. वास्तविक राणेंच्या बंडाकडे काँग्रेसने दुर्लक्षच केले होते.

चव्हाणांचे नेतृत्व अमान्यच, म्हणे, सामुदायिक नेतृत्व!
आगामी निवडणूक सामुदायिक नेतृत्वाखाली लढवली जाईल आणि त्यात योग्य भूमिका वठवण्याची संधी मिळेल, असा दावा करून श्रेष्ठींनी तसे आश्वासन दिल्याचे राणे म्हणाले.
अर्थ : मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्याची घोषणा काँग्रेसर्शेष्ठींनी काही दिवसांपूर्वीच केली. तरीही राणे सामुदायिक नेतृत्वाची भाषा करतात. त्यामुळे चव्हाणविरोध कायम दिसतो.

मवाळ झालेलो नाही, थोडे अँडजस्ट करतोय
आक्रमक राणे मवाळ होत आहेत काय, यावर राणे म्हणाले की, मवाळ झालेलो नाही. थोडे अँडजस्ट करतो आहे. मी महत्त्वाकांक्षी आहे. अजून राजकारण करायचेय. म्हणून श्रेष्ठींवर विश्वास ठेवावा लागला, अशी अगतिकता राणेंनी व्यक्त केली.
पुढे आणखी वाचा, माणिकरावांनी काय म्हटले राणेंबाबत...