आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपची आॅफर, पण मी हो किंवा नाही म्हणालो नाही- राणे; शहांना भेटल्याच्या वृत्ताचे खंडन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ‘भाजपने मला पक्षात येण्याची ऑफर दिली आहे. भाजपवाले सारखे विचारतातही. अजून मी त्यांना ‘हो’ म्हणालो नाही की ‘नाही’सुद्धा म्हटलेले नाही. बुधवारी मी अहमदाबादेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत भाजप अध्यक्ष अमित शहा यांना त्यांच्या घरी भेटल्याच्या बातम्या पसरवल्या जात अाहेत, त्या पूर्णत: चुकीच्या अाहेत. मी कुणालाच भेटलेलो नाही’, असा खुलासा करत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी पक्षांतराच्या चर्चा गुरुवारी फेटाळून लावल्या. 
  
नारायण राणे, त्यांचे पुत्र अामदार नितेश राणे यांनी बुधवारी रात्री अहमदाबादमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाेबत एकाच कारमध्ये प्रवास केल्याची दृश्ये वृत्तवाहिन्यांवर दाखवण्यात अाली. त्यानंतर राणेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला पुन्हा वेग अाला. मात्र, राणेंनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन या सर्व चर्चेचे खंडन केले. ‘गेल्या दोन महिन्यांत मी दोन वेळा मुख्यमंत्र्यांसोबत विमानाने आणि गाडीतूनही प्रवास केला आहे. दूरचित्रवाणी वाहिन्यांवर दाखवली जाणारी आम्ही एकत्र प्रवास केल्याची दृश्ये जुनी असावीत’, असे ते म्हणाले. मी अहमदाबादला मेडिकल काॅलेजच्या  कामासाठी गेलो होतो. तिथे मी हयात हॉटेलमध्ये उतरलो होतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसोबत प्रवासाचा प्रश्नच नाही’, असा खुलासा राणे यांनी केला.   ‘मी अमित शह यांच्या घरी गेलो, असे म्हणता, तर तिथले फोटो दाखवा. तिथून बाहेर पडतानाचा व्हिडिओ आहे का तुमच्याकडे?’ असा सवालही राणे यांनी पत्रकारांना केला.   

मला अनेक अाॅफर्स
मार्केेटमध्ये चांगल्या मालाला सगळे विचारतात, अशी कोपरखळी राणे यांनी या वेळी मारली.  तसेच कुणीही यावे आणि माझ्याशी बोलावे, एवढा स्वस्त मी नाही, असे राणे म्हणाले. आपण काँग्रेस सोडणार नाही, असा पुनरुच्चारही राणे यांनी केला. ‘मला आॅफर आहेत, मात्र माझा निर्णय झालेला नाही’, असे सूचित करून आपल्या पक्षांतराचे गुपित त्यांनी कायम ठेवले.    

दरम्यान, नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त अद्याप ठरला नसला तरी काेणत्याही क्षणी त्यांच्या पक्षप्रवेशाची घाेषणा केली जाऊ शकते, असा तर्क अजूनही राजकीय वर्तुळातून वर्तवला जात अाहे. तर दुसरीकडे, सिंधुदुर्गमध्ये उभारण्यात येणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयांसंबंधीचे काही परवानग्या मिळवण्यासाठी राणेंकडून वारंवार भाजप नेत्यांशी संपर्क साधला जात असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात अाले.

मुख्यमंत्री म्हणतात, ’ही तर पतंगबाजी’
नारायण राणे यांच्याबरोबर आपण अहमदाबादेत भाजप पक्षाध्यक्ष अमित शहा यांची काल रात्री अहमदाबादेत भेट घेतल्याचे वृत्त निराधार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही स्पष्ट केले.  राणे भाजपत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा म्हणचे माध्यमांतली पतंगबाजी आहे, अशी टिप्पणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.  
 
रिपाइंत गेलाे असताे तर अाज केंद्रीय मंत्री झालाे असताे! 
- मी काँग्रेसवर नाराजी व्यक्त करत असल्याने माझ्या पक्षत्यागाचे वातावरण पक्षातील लोकांनीच बनवले आहे.   
- यापूर्वी मी एकदा पक्ष सोडला आहे. निर्णय पक्का झाल्यानंतरच मी दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांना भेटलो होतो. - रामदास आठवले यांचीही मला ‘रिपाइं’साठी आॅफर होती. त्यांच्या पक्षात असतो तर केंद्रीय मंत्री झालो असतो.   
- प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना बदलावे, अशी आपण राहुल गांधी यांच्याकडे मागणी केलेली नाही.   
- पक्षांतर करताना नेत्यांच्या ज्या भेटीगाठी होतात, त्या पोलिसांना आणि पत्रकारांना कळवून केल्या जात नसतात.    
- अशोक चव्हाण यांच्याविरोधात नीलेश राणे कायम बाेलत असले तरी ते त्यांचे वैयक्तिक मत अाहे.

भाजपमध्ये येणाऱ्यांचे स्वागतच करू : दानवे
भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या सर्वच इच्छुकांसाठी आमच्या पक्षाचे दरवाजे नेहमीच खुले आहेत. आम्ही त्यांचे स्वागतच करतो, अशा शब्दांत भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या संभाव्य पक्षप्रवेशाबाबत सूचक प्रतिक्रिया दिली.   

गेल्या दोन आठवड्यांपासून राणेंच्या भाजप प्रवेशाबाबत बोलले जात होते. मात्र, राणे तसेच भाजपकडून याविषयी अधिकृतपणे समोर कुणीही आले नाही. राणे-शहा यांच्या कथित भेटीविषयी दानवेंना विचारले असता ते म्हणाले, आपल्याला याबाबत काही माहीत नाही. मात्र, भाजपमध्ये येणाऱ्यांचे पक्षात स्वागत आहे. देशात आणि राज्यात अनेक घडामोडी घडतात. त्यातीलच ही एक घटना असेल. पक्षात येणाऱ्याला आम्ही कार्यकर्ता म्हणून घेतो. राणे हे माजी मुख्यमंत्री असून त्यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन महत्त्वाचे मंत्रिपद देण्याचाही भाजपमध्ये विचार सुरू असल्याचे बोलले जाते. याविषयी शहा व फडणवीस यांच्यात चर्चा झाल्याचे कळते. यावर दानवे यांनी काहीही बोलण्यास नकार दिला.  

पुढील स्लाइडवर वाचा...
> फडणवीसांची मर्जी सांभाळण्यासाठी नारायण राणेंना भाजपमध्ये 'नो एन्ट्री', पक्षाध्यक्षांचे दिले होते संकेत
> नारायण राणेंचा दिल्लीत मुक्काम; भाजप प्रवेशाची चर्चा, गडकरींच्या मध्यस्थीने शाहांची भेट?
> नीलेश राणे यांचा काँग्रेेसच्या सरचिटणीसपदाचा राजीनामा, भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा


(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

 
बातम्या आणखी आहेत...