आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाजपच्या सल्ल्याने राणेंचा नवा पक्ष; लवकरच मंत्रिपदही; महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची घाेषणा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - काँग्रेसमधून बाहेर पडत भाजप प्रवेशासाठी आतुर नारायण राणे यांनी रविवारी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष या नव्या पक्षाची स्थापना केली. पक्षाच्या स्थापनेच्या घोषणेला एक तासही उलटत नाही तोपर्यंत भाजपने त्यांना एनडीएत येण्याचे आमंत्रण दिले.  इतकेच नव्हे तर राणेंना लवकरच राज्यात महत्त्वाचे मंत्रिपद देणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली. सत्तेत राहून भाजपविराेधात दंड थाेपटणाऱ्या शिवसेनेला धक्का देण्यासाठी भाजपकडून ही खेळी खेळली जात असल्याचे सांगितले जाते.

मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्रात आयोजित पत्रकार परिषदेत नव्या पक्षाची स्थापना करत असल्याची घोषणा करताना नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केला. भाजपने लिहून दिलेल्या स्क्रिप्टनुसारच त्यांनी शिवसेनेवर टीका केल्याची माहिती भाजपमधील सूत्रांनी दिली. पक्षाचा झेंडा आणि चिन्ह असे काहीही तयार नसताना राणेंनी पक्षाचे नाव जाहीर केले. पत्रकार परिषदेत एनडीएत जाणार का, असा प्रश्न विचारला असता राणे यांनी पक्ष स्थापन झाल्यावर विचार करू आणि एनडीएकडून बोलावणे आल्यास जाऊ, असे उत्तर देत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र लगेच त्यांना एनडीएकडून आमंत्रण आले आणि त्यांनीही एनडीएत सामील होण्यास होकार दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.  शिवसेना आणि राणे यांच्यातून विस्तवही जात नाही. शिवसेना सतत केंद्र आणि राज्य सरकारच्या कामावर टीका करत असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयावर शिवसेना टीका करते त्यामुळे भाजपचे दिल्लीतील नेतृत्व नाराज होते. 

शिवसेनेला त्यांच्यात शब्दात उत्तर देण्यासाठी त्यांना नारायण राणेंसारख्या नेत्याची आवश्यकता आहेच. परंतु त्यांना पक्षात घेतल्यास पक्षासाठी डोकेदुखी होईल त्यामुळे त्यांना बाहेर ठेवूनच शिवसेनेला उत्तर देण्यास सांगायचे, ही यामागे भाजपची रणनीती असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

शिवसेनेवर टीका
नव्या पक्षाची घोषणा राणेंनी उद्धव ठाकरेंचा समाचार घेत केली. शिवसेनेत उद्धव वगळता व काँग्रेसमध्ये अशाेक चव्हाण वगळता सर्वच अापले मित्र असल्याचेही राणे म्हणाले. ‘शिवसेना ही कधीच सत्तेबाहेर पडणार नसून त्यांना हाकलले तरच ते सत्तेबाहेर जातील.  उद्धव सरकारच्या निर्णयावर टीका करतात. मात्र, शिवसेनेचे मंत्री मंत्रिमंडळाच्या बैठकीत का गप्प बसतात? पंतप्रधान मोदी, शरद पवार यांच्यावर टीका करण्याआधी उद्धव यांनी आत्मपरीक्षण करावे,’ असा खोचक सल्लाही राणे यांनी दिला. सत्तेत राहून भांडण करण्यापलीकडे शिवसेनेने काहीच केले नाही. मुंबईतून मराठी माणस हद्दपार झाला असून त्याला शिवसेना जबाबदार असल्याची टीकाही राणेंनी केली. तर मनसे हा माध्यमांनी जिवंत ठेवलेला पक्ष असल्याचा टाेलाही त्यांनी राज ठाकरेंना लगावला.
 
शिवसेना संभ्रमात
एनडीएच्या राणेंना आमंत्रणाबाबत शिवसेनेच्या काही नेत्यांशी संपर्क साधला असता उद्धव याबाबत भूमिका घेतील, असे सांगण्यात आले. राणे डोकेदुखी ठरू शकतील का, असे विचारले असता एका नेत्यानेे, ‘राणेंना आम्ही गिनतच नाही तर डोकेदुखी कशी ठरेल?’ असा प्रतिप्रश्न केला.
 
अमित शहांची अटकळ
राणेंनी दिल्लीत भाजप अध्यक्ष अमित शहांशी भाजप प्रवेशाबाबत चर्चा केली हाेती. त्यांनी काही अटीही ठेवल्या हाेत्या. मात्र राणेंना थेट भाजपत घेऊन पक्षातील नेत्यांचा व शिवसेनेचा राेष ओढवून घेण्यापेक्षा त्यांचा अप्रत्यक्ष वापर करून घेण्याची अटकळ शहांनी लढवली.
 
काही प्रश्नांवर गप्पच...
- पुत्र नितेश राणे काँग्रेसची अामदारकी साेडून नव्या पक्षात कधी येणार,  तुमच्यासाेबत किती अामदार येणार या प्रश्नांवर राणेंनी उत्तर टाळले.
- एनडीएत जाणार का, मंत्रिपद घेणार का? या प्रश्नावर वेळ मारून नेली.
- राज्यात तुमचा प्रमुख प्रतिस्पर्धी काेण असेल? महागाई व सामान्य जनतेविराेधी सरकारच्या भूमिकेला विराेध करणार का? या प्रश्नावरही राणेंकडे उत्तर नव्हते.
- शिवसेना हा प्रतिस्पर्धी नसेल हे सांगताना राणेंच्या बाेलण्याचा सर्व राेख मात्र उद्धव ठाकरेंच्या विराेधातच हाेता.
 
पुढील स्लाईडवर पाहा राणेंच्या भाषणातील अन्य मुद्दे आणि विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया
बातम्या आणखी आहेत...