आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narayan Rane News In Marathi, Congress, Divya Marathi

बंडाआधीच नारायण राणे घायाळ, कट्टर समर्थक रवींद्र फाटक शिवसेनेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शिवसेना सोडताना आमदार आणि वजनदार नेत्यांना सोबत घेऊन काँग्रेसमध्ये गेलेले नारायण राणे हे काँग्रेस सोडण्याची तयारी करीत असताना एकाकी पडल्याचे चित्र आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर राणेंनी तोफ डागून 24 तास होण्याच्या आत ठाकरे यांनी राणेंचे अत्यंत जवळचे सहकारी रवींद्र फाटक यांना शिवसेनेत आणून राणेंना पहिला दणकाच दिला.
फाटक यांच्यासोबतच कोकणातील राणेंचे उजवे हात मानले जाणारे राजन तेली यांनीही उघडपणे पाठ फिरविल्याने राणेंच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे राजकीय जायबंदी झालेले राणे काँग्रेस सोडून जाणार नाहीत, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.फाटक हे ठाण्याच्या राजकारणातील मोठे नाव असून त्यांचा शिवसेना प्रवेश राणेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे. राणेंचे समर्थक मानले जाणारे कालिदास कोळंबकरही राणेंनी काँग्रेस सोडल्यास त्यांच्यासोबत जाण्यास इच्छुक नाहीत. पुण्यातील आमदार विनायक निम्हण (शिवाजीनगर), माणिकराव कोकाटे (सिन्नर), शिरीष कोतवाल (अपक्ष-चांदवड), सुभाष बने ( माजी आमदार), गणपत कदम (माजी आमदार ) आणि विधान परिषद सदस्य सुरेश नवले हे राणे समर्थक आमदारही काँग्रेस सोडून राणे जात असतील तर त्यांच्यासोबत जातील, याची खात्री देणे आता कठीण झाले आहे. जयवंत परब, श्रीकांत सरमळकर, सदा सरवणकर हे पुन्हा शिवसेनेत परतले आहेत. प्रकाश भारसाकळे, शंकर कांबळी आणि राजा राऊत (बार्शी) हेसुद्धा पुन्हा सेनेत परतले. त्यामुळे आता राणेंसाठी काँग्रेस सोडण्याचे धाडस काँग्रेसमध्ये खूपच नाराज असलेले एक-दोन आमदारच करू शकतात.

राणे समर्थकांना मुख्यमंत्र्यांनी घेतले विश्वासात
राणेंच्या बंडाची कुणकुण लागताच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसमधील राणेंच्या सर्व आमदारांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न खूप आधीच सुरू केलाय. यापैकी अनेकांना पुन्हा तिकिटे देण्याचे आश्वासन देण्यात आलेय. राणेंसोबत सेना सोडून काँग्रेसमध्ये आलेले आमदार विजय वडेट्टीवार हे पक्षात असले तरी आता त्यांनी निष्ठा बदलल्या असून ते अशोक चव्हाण यांच्या गटात गेले आहेत.

यापुढे माझ्यावर टीका केली तर उद्धव यांचे वस्त्रहरणच करेन.
उद्धवने बाळासाहेबांचा सर्वाधिक छळ केला.
(नारायण राणे यांचा पत्रपरिषदेत घणाघात)
राणेंना आता सांत्वनाची गरज आहे. त्यांना कोणत्या तरी पक्षात मन:शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
(राणेंच्या शुक्रवारच्या टीकेला प्रत्युत्तर)

राणेंची सावध भूमिका
आपल्या पाठीमागे कुणी यायला तयार नाही, हे बघून राणेही सावध आहेत. त्यांनी श्रेष्ठींवर टीका करण्याचे टाळले आहे. राजीनाम्यावर ठाम असलो तरी अन्य पक्षात जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

...तर पक्ष काढा : मनसे
स्वत:चा पक्ष काढून तो उभा करण्यासाठी हिंमत लागते. ती असेल तर राणे यांनी पक्ष काढावा, असे आव्हान मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर यांनी दिले.
ठाण्यात शिवसेना मजबूत : ठाणे पालिकेत सत्ता कायम राखताना उद्धव ठाकरेंना कधी भाजप, कधी मनसे यांची मदत मागावी लागत होती. मात्र आता फाटक यांच्यासह 8 नगरसेवकांना पक्षात आणून सत्तेवरची मांड त्यांनी मजबूत केली. तसेच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनाही आता शिवसेना तगडे आव्हान देऊ शकेल.