आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयत्यावेळी नमते घेणाऱ्या राणेंचा पक्षनेतृत्वाला पुन्हा इशारा, केली बंडाची भाषा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- कॉंग्रेस माझा सेवादल करण्याच्या प्रयत्नात आहे. परंतु, मी काही गप्प बसणार नाही. मी धगधगता निखारा आहे. 'तो' कधी खुर्चीवरून उठतो आणि 'मी' कधी बसतो, अशी कॉंग्रेसी प्रवृत्ती बदलली पाहिजे, अशा शब्दांत उद्योगमंत्री नारायण राणे यांनी कॉंग्रेसलाच शाल-जोडीतले फटके मारले.

काही वर्षांपूर्वी मुख्यमंत्रीपद न मिळाल्यामुळे नाराजीचा सूर आळवत पक्षनेतृत्वावर टीका करणाऱ्या राणेंनी आयत्यावेळी माघार घेतली होती. त्यानंतर त्यांनी महसुल खात्यावर समाधान मानले होते. आता पुन्हा पक्षनेतृत्वार टीका करून राणे कोणता पक्षी मारण्याच्या प्रयत्नात आहेत, हे बघण्यासारखे आहे.

ठाण्यात झालेल्या कोकण विभागीय कार्यकर्ता मार्गदर्शन शिबीरात कार्यक्रर्त्यांना संबोधित करताना नारायण राणे यांनी पक्षनेतृत्वावर तोंडसुख घेतले. यावेळी ते म्हणाले, की महाराष्ट्रात सेवादल अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. तरीही राज्यात कॉंग्रेसची स्थिती बळकट नाही. याचा विचार व्हायला हवा. कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आपल्याच पक्षाच्या चुकीच्या धोरणांवर चर्चा करीत बसण्यापेक्षा युती किंवा मनसेला टार्गेट करावे. कुणीही नाही सापडले तर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षावर टीका करावी.

भाजपवर बोलताना राणे म्हणाले, की भाजप म्हणजे बाजारातला भाजीपाला आहे. त्यांच्याकडे काहीही ठोस धोरण नाही. नरेंद्र मोदी यांची केवळ जाहिरातबाजी सुरू आहे. त्यांच्या मुंबईतील सभेवर 50 कोटी रुपये खर्च करण्यात आला. हा पैसा देवळातून आणला की अयोध्येतून याचे उत्तर भाजपने द्यायला हवे.

टोल नाक्यावर बोलताना राणे म्हणाले, की टोलनाके युतीच्या काळात आले. तेव्हा त्याला विरोध झाला नाही. तेव्हा टोल चालत होता. आता निवडणुकीच्या तोंडावर चालत नाही.