मुंबई - उद्योगमंत्री नारायण राणे यांनी आपण मंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा गुरुवारी केली आहे. मुलगा नितेश यांच्या स्वाभिमानी संघटनेचे ‘महाराष्ट्र स्वाभिमानी सेना’ या पक्षात रूपांतर करण्याची घोषणा ते सोमवारी करण्याची शक्यता आहे. हा राज ठाकरे यांच्या मनसेशी युती करून हा नवा पक्ष मुंबई, पुणे, ठाणे, कोकण, नाशिक व मराठवाड्यात निवडणुका लढवणार असल्याचे समजते. दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी फोन करून राणे यांना दोन-चार दिवस धीर धरण्याचा सल्ला दिला आहे.
एमआयडीसी अधिका-यांच्या बैठकीत राणे म्हणाले, मी आता मंत्रिपदी राहणार नाही, माझी तुमच्यासोबतची ही शेवटचीच बैठक आहे. मंत्रिपद सोडणार नाही, असे राणे म्हणाले खरे, पण सोमवारी आणखी धक्के देण्याचे सूतोवाचही त्यांनी केले. नवा पक्ष हाच तो धक्का असू शकेल.
दरम्यान, सोनिया गांधी यांनी राणे यांच्याशी संपर्क साधल्यानंतर प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यासह काँग्रेसच्या काही नेत्यांनी राणेंच्या निवासस्थानी धाव घेऊन त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री चव्हाण हेदेखील शुक्रवारी राणे यांच्याशी चर्चा करणार आहेत.
राणेंचे दुसरे बंड
शिवसेना सोडताना 2005 मध्ये राणेंनी पहिले बंड केले होते. अनेक आमदारांसह सेनेच्या कार्यकर्त्यांना घेऊन ते काँग्रेसमध्ये गेले होते. आता दुसरे बंड करताना काँग्रेसमधील आपल्या निष्ठावंत समर्थक व पदाधिका-यांना स्वाभिमानी पक्षात घेऊन जातील, असे बोलले जाते.
वेगळी चौकट...
मराठा आरक्षणाचा लाभ मिळणार : राणेंच्या अहवालामुळेच आरक्षणाचा निर्णय घेणे शक्य झाल्याची भावना मराठा संघटनांमध्ये आहे. नव्या पक्षास त्याची सहानुभूती मिळवण्यासाठीही राणे यांचे प्रयत्न राहतील.
काँग्रेसमध्ये भविष्य नसल्याने अस्वस्थ
पुत्र नीलेशच्या लोकसभेतील पराभवामुळे राणे काँग्रेस आघाडीवर नाराज होते. प्रयत्नांनंतरही मुख्यमंत्रिपद मिळत नसल्याने त्यांची घुसमट सुरू होती. त्यातच पृथ्वीराज चव्हाण यांच्याच नेतृत्वाखाली निवडणुका होण्याचे स्पष्ट झाले.
भाजप प्रवेशाचे प्रयत्न व्यर्थ
राणेंनी गोपीनाथ मुंडे यांची भेटही घेतली होती. मात्र मुंडेंच्या निधनानंतर राज्यातील भाजपने त्यांना विरोध केला. पक्षाध्यक्ष अमित शहांना भेटून शह देण्याचा प्रयत्नही त्यांनी केला. पण शिवसेनेची नाराजी नको म्हणून भाजपने हा विषय संपवला.
शिवसेनेचे दार बंदच
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राणेंना शिवसेनेची दारे कायमची बंद केली आहेत. मात्र भाजपच्या पर्यायालाही शिवसेनेने विरोध केला. ज्यांच्याविरुद्ध कोकणात रान पेटवले त्यांनाच सोबत कसे घ्यायचे ही शिवसेनेची भूमिका होती.
मुंबईत गेल्यावर राणे यांच्याशी बोलतो आणि मगच काय ते सांगतो!
मी मुंबईबाहेर आहे, राणे नेमके काय म्हणाले, कशामुळे त्यांनी घोषणा केली, हे माहिती नाही, मुंबईत गेल्यावर राणेंना भेटतो, बोलतो आणि नंतर काय ते तुम्हाला सांगतो, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी दिली. राणेप्रकरणी आणखी विचारण्याचा पत्रकारांचा पवित्रा दिसताच चव्हाण खुर्चीवरून उठले. 45 सेकंदांत त्यांनी विषय संपवला.