आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narayan Rane News In Marathi, Sonia Gandhi, Delhi, Cm

बंड झाले थंड: नारायण राणे बॅकफूटवर, सोनिया गांधी करणार फैसला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर टीका करत उद्योगमंत्रिपदाचा राजीनामा देणारे कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे 24 तासांतच बॅकफूटवर आले आहेत. मंगळवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याशी सुमारे दोन तास झालेल्या चर्चेनंतर राणेंनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधींशी चर्चा करून दोन दिवसांत पुढील निर्णय घेऊ, अशी नरमाईची भाषा केली. यावरूनच राणेंचे बंड थंड होण्याची शक्यता कॉँग्रेसच्या वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.
मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर तोफ डागत काँग्रेसचे नेते नारायण राणेंनी सोमवारी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. असाच कारभार राहिला, तर येत्या विधानसभा निवडणुका जिंकणे कठीण असून या पराभवात आपण वाटेकरी होणार नसल्याचेही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते. तसेच राजीनामा मंजूर झाल्यानंतर आपली पुढची भूमिका स्पष्ट करू, असा दावाही केला होता. मात्र, अवघ्या 24 तासांत राणेंनी आपली भूमिका बदलली.

आश्वासनांवर बोळवण
मंगळवारी सकाळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि नारायण राणे यांच्यात मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी सुमारे दोन तास चर्चा झाली. त्यातही राणेंचा सूर काहीसा सौम्य होता, अशी माहिती सूत्रांनी दिली. या वेळी राणेंनी आपल्या तक्रारी मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. काही प्रलंबित निर्णयांवरही नाराजी व्यक्त केली. त्यावर आपले आक्षेप आणि मते पक्षाध्यक्षांच्या कानावर घालू, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे कळते.
कोकणच्या बैठकीला होकार : विधानसभेच्या पूर्वतयारीसाठी काँग्रेसच्या वतीने प्रादेशिक बैठका घेतल्या जात आहेत. मात्र, दोन वेळा वेळापत्रकात समावेश असूनही राणेंनी या बैठकीला नकार दिला होता. मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर मात्र राणेंनी कोकणची बैठक घेण्यासाठी होकार दिल्याची माहिती प्रदेशाध्यक्षांनी दिली.

बैठक निष्फळ, डोळे दिल्लीकडे
माणिकराव ठाकरे यांनी सांगितले की, राजीनाम्याचा फेरविचार करावा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी राणेंना केली. राणेंनी ज्या प्रशासकीय प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीबाबत नाराजी व्यक्त केली होती, ते प्रश्न सोडवतो, असे आश्वासनही दिले आहे. बैठकीनंतर मुख्यमंत्री म्हणाले की, राणेंच्या आक्षेपाबाबत आपण दोन दिवसांत सोनिया गांधींशी चर्चा करणार आहोत. त्यांच्या आक्षेपांवर तोडगा निघेल असे वाटते. राणेंनी मात्र बैठक निष्फळ ठरल्याचे सांगितले.

पद मिळवण्यासाठीच खटाटोप
मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांबरोबर झालेल्या चर्चेत राणेंचा सूर काहीसा मवाळ होता. राजीनाम्याच्या घोषणेनंतर कोकणात जाऊन वातावरण ढवळून काढू आणि त्या माध्यमातून पक्षश्रेष्ठींवर दबाव टाकू, अशी राणेंची रणनीती होती. मात्र, कोकणात अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यानेच राणेंनी आपली तलवार म्यान केल्याची चर्चा काँग्रेसमध्ये आहे. त्यामुळे राणेंचे बंड छोट्या-मोठ्या तडजोडीनंतर शमेल, असाच सूर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये उमटतो आहे.