नारायण राणेपुत्र, समर्थकांतील / नारायण राणेपुत्र, समर्थकांतील संघर्ष कोकणात शिगेला

Jul 04,2014 03:57:00 AM IST
मुंबई - सिंधुदुर्ग- रत्नागिरी मतदारसंघात नीलेश राणे यांच्या पराभवाचे खापर त्यांचे धाकटे बंधू व उद्योगमंत्री नारायण राणे यांचे पुत्र नितेश यांनी आपल्या पक्षातल्या पदाधिकार्‍यांवरच फोडले आहे. राणेंच्या अतिशय विश्वासू नेत्यांपैकी राजन तेली, काका कुडाळकर आणि सुरेश पडते यांच्यावर नितेश यांनी तोफ डागली. दुसरीकडे राणे समर्थकांनीही एक पत्रक काढून नितेश यांच्या आरोपांना जशास तसे उत्तर दिल्याने तळकोकणात कॉँग्रेस पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर पोहोचला असल्याची चिन्हे आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या पराभवाचे पडसाद आता कोकणात उमटायला सुरुवात झाली आहे. ‘राणेंच्या निकटवर्तियांनीच जमिनींचे गैरव्यवहार केले आणि बदनामी मात्र नारायण राणेंची झाली,’ असा हल्ला चढवत नितेश यांनी आता आता भाकरी परतण्याची नाही तर बदलायची वेळ आली आहे, असा सूचक इशाराही पत्रकार परिषदेतून दिला होता. सामान्य कार्यकर्ता आणि नारायण राणे यांच्यातला संवाद कमी व्हायलाही हेच मूठभर पदाधिकारी जबाबदार आहेत, असा आरोप करत नितेश यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष काका कुडाळकर, माजी आमदार राजन तेली आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश पडते या पदाधिकार्‍यांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला होता. हे नेते नारायण राणेंचे कट्टर समर्थक समजले जातात. तरीही नितेश यांनी केलेल्या टीकेवर अजून तरी नारायण राणेंनी कोणतीही प्रतिक्रिया न दिल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता आहे.

राणे समर्थकांनीही आरोपांना तोडीस तोड जवाब दिला आहे. ‘आपण फक्त सोनिया गांधी, राहुल गांधी, माणिकराव ठाकरे आणि नारायण राणेंचे नेतृत्व मानतो. आपल्याला जाब विचारण्याचा अधिकार फक्त या नेत्यांनाच आहे,’ असे समर्थकांनी पत्रकात म्हटले आहे.

‘इतर कोणी काय बोलतो आहे याला आपल्या लेखी महत्व नसल्याचा टोलाही त्यांनी नितेश यांना लगावला. पूत्र व समर्थकांच्या वादात नारायण राणे कोणाची बाजू घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
(फोटो - नीलेश राणे, नितेश राणे)
X