आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलाने डीपी बदलताच राणेंच्या काँग्रेस सोडण्याची चर्चा, शहांच्या दौऱ्यामुळे चर्चेला ऊत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- काँग्रेसचे आमदार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणेंचे पुत्र नितेश राणे यांनी आपल्या व्हॉट्सअॅप अकाउंटचा डीपी बदलल्याने राणे पितापुत्रांच्या काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेशाची चर्चा नव्याने सुरू झाली आहे. त्यातच भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांची दोन दिवसांपूर्वीची दिल्लीवारी, राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांचा २७ ऑगस्टचा मुंबई दौरा आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राणेंबाबत केलेले सूचक वक्तव्य या सर्व घडामोडींमुळे राणेंच्या भाजप प्रवेशाची वातावरणनिर्मितीदेखील झाली आहे.   
 
नितेश राणे यांनी शनिवारी सकाळी अचानकपणे आपल्या व्हॉट्सअॅपचा डीपी बदलला. या डीपीमध्ये नारायण राणेंचे छायाचित्र असून त्यांच्या मागे भगव्या रंगाची एक छटा दिसत आहे. ‘नारायण राणे हाच आमचा पक्ष’असा मजकूरही या छायाचित्रावर दिसत आहे. हेच छायाचित्र नितेश राणेंनी आपल्या ट्विटर अकाउंटवरूनही प्रसारित केले आहे. त्यातच २७ ऑगस्ट रोजी अमित शहा हे मुंबई दौऱ्यावर असून लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी ते मुंबईत येत असल्याची माहिती भाजपच्या एका बड्या पदाधिकाऱ्याने दिली आहे. या सर्व घडामोडींमुळे राणे पितापुत्रांच्या भाजप प्रवेशाची चर्चा पुन्हा एकदा नव्याने सुरू झाली आहे. भरीस भर म्हणजे काही दिवसांपूर्वी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना एका प्रश्नाच्या उत्तरादरम्यान, ‘राणे भाजपमध्ये आल्यास त्यांचे स्वागतच आहे’अशा आशयाचे विधान केले होते.   

राणेंच्या गोटातून भाजप प्रवेशाच्या बातम्या   
दोन दिवसांपूर्वी झालेल्या भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीच्या दिवशी सकाळी मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी दिल्ली येथे जाऊन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान राणेंच्या भाजप प्रवेशानंतर कोकणातील राजकीय समीकरणे काय असतील याबाबतची चर्चा झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. मात्र, या सर्व घडामोडींबाबत भाजपच्या एका मोठ्या नेत्याला विचारले असता या नेत्याने, राणेंच्या भाजप प्रवेशाची शक्यता साफ फेटाळून लावली आहे. अशा बातम्या राणेंच्याच वर्तुळातून पसरवल्या जात असाव्यात, अशी शक्यताही या नेत्याने ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केली. त्यामुळे राणेंचा प्रवेश  कधी होतो, हे पाहावे  लागेल.
 
हेही वाचा-
बातम्या आणखी आहेत...