आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नारायण राणे यांचा थयथयाट सुरूच!, शिवसेना, एमअायएम नेत्यांवर टीकेचा भडिमार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - विधानसभा निवडणुकीत सहा महिन्यांत सलग दाेनदा झालेला पराभव माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या फारच जिव्हारी लागला अाहे. वांद्रे पाेटनिवडणुकीचा निकाल जाहीर हाेऊन दाेन दिवस उलटले तरी राणे पिता- पुत्रांचा शिवसेना व एमअायएमविराेधातील थयथयाट अजून संपायला तयार नाही. मात्र, दोन्ही पक्षांच्या नेत्यांनीही राणेंवर प्रतिहल्ला चढवल्याने शुक्रवारी राजकीय वातावरण पुन्हा ढवळून निघाले.

एमएमआयकडून मुस्लिम तरुणांना ड्रग्जचा पुरवठा केला जातो, असा सनसनाटी आरोप करणा-या अामदार नीलेश राणे यांनी यासंबंधीचे पुरावे देताना एमआयएमच्या एका कार्यकर्त्याचे नाव जाहीर केले, तर दुसरीकडे राणेंनी शिवसेना पक्ष व त्यांच्या नेत्यांची लायकी काढली. त्याला उत्तर देताना खासदार विनायक राऊत यांनी राणे कधीच कोणाशीही प्रामाणिक राहू शकत नाहीत. त्यांनी राज ठाकरेंनाही फसवले होते, असा आरोप करून नवे वादळ निर्माण केले.

‘अडला' नाही, पुन्हा ‘भिडला' नारायण
वांद्रे पूर्व पाेटनिवडणुकीत नारायण राणेंच्या पराभवाचे कवित्व अजून संपलेले नाही. अाराेप- प्रत्याराेपांच्या फैरी अजूनही सुरूच अाहेत. शिवसेनेच्या विजयानंतर राणेंच्या निवासस्थानाबाहेर जल्लाेष करणा-या शिवसैनिकांना राणे समर्थकांनी पाेस्टरमधून चाेख प्रत्युत्तर दिले अाहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कलानगरातील ‘माताेश्री’ निवासस्थानाजवळ राणे समर्थकांनी भव्य पाेस्टर लावले अाहे. त्यावर ‘अडला नाही, सदैव नडला नारायण, पडला तरी मर्दासारखा पुन्हा भिडला नारायण' असा संदेश लिहून शिवसेनेला प्रत्युत्तर देण्यात अाले अाहे.

राणेंकडून पाच काेटींची अाॅफर: रामदास कदम
एमआयएमला मॅनेज करण्यासाठी राणेंनी पाच कोटींची ऑफर दिली होती, असा अाराेप शिवसेना नेते रामदास कदम यांनी केला अाहे. त्याला राणेंनी चोख प्रत्युत्तर दिले. कदम हा अतिशय बेजबाबदार माणूस असून कॅबिनेट मंत्री होण्याची त्यांची लायकी नाही. तसेच मी जेव्हा शिवसेनेत होतो, तेव्हा या नेत्यांची माझ्या आजूबाजूला उभा राहण्याची हिंमत नव्हती. ज्यांचे स्वत:चे कर्तृत्व नाही, त्यांची माझ्या भविष्याबद्दल बोलण्याची लायकी नाही, असेही ते म्हणाले.

बशीरकडून ड्रग्ज : नीलेश
एमआयएमचा कार्यकर्ता असलेला बशीर खान मुस्लिम तरुणांना ड्रग्ज पुरवण्याचे काम करतो. आरोपांचे पुरावे द्या, असे एमआयएम नेते म्हणत आहेत, तर घ्या पुरावा. कब्रस्तान गोळीबार रोडवरील बशीर खान हा पक्षाचा कार्यकर्ता ड्रग्ज पुरवण्याचे काम करत असतो, असे ट्विट नीलेश यांनी केले आहे.

‘एमअायएम’कडून खंडन
एमएमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनी नीलेश यांचे ड्रग्जबाबतचे अाराेप फेटाळून लावले अाहेत. नीलेश यांनी प्रसिद्धी मिळवण्यापेक्षा पाेलिसांकडे तक्रार करावी. पराभव पचवायलासुद्धा मोठे मन लागते. पण ते राणे व त्यांच्या चिरंजीवांकडे आहे, असे दिसत नाही, असा टोला त्यांनी लगावला.

अाताची शिवसेना वाघ नव्हे, तर मांजर : राणे
शिवसेना आता वाघ नव्हे, तर मांजर झाली आहे. कोणीही निष्ठावान शिवसैनिक उरले नाहीत. बाळासाहेब गेल्यानंतर उरलेत ते कमर्शियल शिवसैनिक. मुंबई पालिका हे शिवसेनेचे दुकान असून कामधंदा न करता मनपाच्या टक्केवारीवर जगणारी अनेक कुटुंबे शिवसेनेत असल्याचा आरोप नारायण राणेंनी केला आहे.

अाता कणकवलीतून लढून दाखवा !
राणे आपण मर्दासारखे लढलो, असे म्हणत असले तरी त्यांना लोकांनी दोनदा पाडले. राणेंची दादािगरीची भाषा जनतेला पसंत नाही. आता त्यांनी नितेश यांना राजीनामा द्यायला सांगून कणकवणीतून पोटनिवडणूक लढावी, असे अाव्हान शिवसेनेचे प्रवक्ते अरविंद भाेसलेंनी दिले.

राणेंनी राज यांनाही फसवलेे : राऊत
नारायण राणे कधीच प्रामाणिक राहिले नाहीत. शिवसेनेत पुन्हा मुख्यमंत्री होता येणार नाही, हे कळल्यावर त्यांनी पक्ष सोडला. २००५ मध्ये राजही बाहेर पडले. हे दोघे नवा पक्ष काढायचा विचार करत होतेे; पण राणेंनी त्यांना धाेका दिला, असा गौप्यस्फोट विनायक राऊत यांनी केला.