मुंबई- अंनिसचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात अालेला सनातनचा साधक डाॅ. वीरेंद्रसिंह तावडे हा सध्या फरार असलेला दुसरा पुण्यातील साधक सारंग अकोलकरच्या सतत पाच वर्षे संपर्कात असल्याची बाब त्याच्या ई-मेल तपासणीतून उघड झाली आहे.
वीरेंद्रसिंह तावडेच्या विरोधात त्याचे ई-मेल संभाषण हाच प्रमुख पुरावा ठरू शकतो ही बाब लक्षात घेऊन सीबीआय पथकाने याच अंगाने तपास सुरू केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दाभाेलकर हत्येच्या कटात तावडे आणि अकोलकर या दोघांसह आणखी तीन जण सहभागी असल्याचा सीबीआयला संशय असून त्याबाबतचे काही दुवे तावडेच्या ई-मेल संभाषणाद्वारे मिळतात का, याचा कसून तपास सुरू अाहे.
वीरेंद्र तावडे हा २००८ ते २०१३ या कालावधीत म्हणजे दाभोलकरांच्या हत्येपूर्वीपर्यंत फरार असलेल्या सारंग अकोलकरच्या नियमित संपर्कात असल्याची बाब सीबीआयच्या चौकशीतून समोर आली आहे. सनातन संस्थेशी संबंधित असलेला अकोलकर हा गोव्यातील मडगाव बॉम्बस्फोटातील फरार आरोपी अाहे. या दाेघांमध्ये अनेकदा ई-मेलद्वारे झालेल्या संभाषणात हत्येसाठी हत्यारांची तजवीज करण्याबाबतचे किंवा गावठी हत्यारे तयार करणारा एखादा छुपा कारखाना उभारण्याबाबतचे अनेक उल्लेख असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच या कारखान्यासाठी लागणाऱ्या पैशाच्या उभारणीबाबतही या दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समाेर अाली अाहे. तसेच गावठी हत्यारांपेक्षा विदेशी हत्यारे किती उपयुक्त ठरतात, या विषयांवरही या दोघांमध्ये एका ई-मेल संभाषणादरम्यान चर्चा झाल्याची माहिती सीबीअायच्या हाती लागली आहे. त्यादृष्टीने पथक पुढील तपास करत असल्याची माहिती देण्यात अाली.
पाच जणांच्या सहभागाचा संशयडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या कटात तावडे आणि अकोलकर यांच्यासह आणखी किमान तीन जणांचा सहभाग असल्याचा सीबीआयला संशय असून त्या दिशेने तपास सुरू आहे. या पाच जणांच्या अनेकदा गुप्त बैठका झाल्या होत्या. त्या बैठकीत हत्येच्या नेमक्या वेळेबाबतच अनेकदा चर्चा झाल्याची बाब तपासादरम्यान समोर येत आहे.
पुरावे उभारणीवर तपासयंत्रणांचा भर
सध्या सीबीआयच्या कोठडीत असलेल्या वीरेंद्रसिंह तावडे याचा डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी सहभाग असल्याचे परिस्थितीजन्य पुरावे उभारण्यावर सीबीअायने भर दिला आहे. कारण याअगोदर अशा प्रकारच्या अनेक प्रकरणांमध्ये सबळ पुराव्यांच्या अभावाचा फायदा आरोपीला मिळाल्याची अनेक उदाहरणे समोर आली असल्याने याप्रकरणी सुरुवातीपासूनच हा प्रयत्न असल्याचे सीबीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.