आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- भाजपने महाराष्ट्रात मनसेशी जवळीक करण्याचे परिणाम फक्त राज्यात महायुतीवरच होणार नाहीत, तर त्याचा फटका उत्तर प्रदेश व बिहारमध्ये बसण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यांनी बिहारी व उत्तर भारतीयांना चोपणार्या मनसेला जवळ करणार्या मोदींना तुम्ही मतदान करणार का, असा सवाल आपापल्या राज्यातील मतदारांना करण्यास सुरुवात केली आहे.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मध्यंतरी गुजरात भेट घेऊन मोदींच्या कारभाराचे गोडवे गायले होते. आता भाजपचे नेते नितीन गडकरी यांच्या भेटीनंतर मोदींना पाठिंबा देण्याची राज यांनी केलेली घोषणा, या माहितीचा वापर करून नितीश व अखिलेश यांनी मोदींविरोधात प्रचार करण्यास प्रारंभ केला आहे.
लोकसभेची गादी मिळवण्यासाठी उत्तर प्रदेश व बिहार ही दोन राज्ये अत्यंत महत्त्वाची आहेत. मोदी लाटेचा प्रभाव या दोन्ही राज्यांवर दिसत असला तरी विरोधकांनी मोदींविरोधात लोकांचे लक्ष वेधून घेण्याची एकही संधी सोडलेली नाही. त्यात गुजरातमधील दंगल, गुजरातमधील विकासाची प्रत्यक्षाहून मोठी केलेली प्रतिमा या दोन मुद्द्यांचा समावेश तर आहेच, पण आता राज यांच्या मोदी मैत्रीचाही नवा मुद्दा समाविष्ट करण्यात आला आहे.
शिवसैनिकही भाजपच्या विरोधात
महायुतीत राहून मनसेला शुकशुक करण्याच्या भाजपच्या डबल गेममुळे शिवसैनिकांत नाराजीचे वातावरण आहे. पदाधिकार्यांची हीच भावना असून शिवसेनेने भाजपला बाजूला ठेवून एकट्याच्या साथीने निवडणुकांना सामोरे जायला पाहिजे, अशीच या सार्यांची भावना आहे. तसे त्यांनी उद्धव ठाकरे यांना बोलूनही दाखवले होते. मनसेने शिवसेनेविरोधात उमेदवार उभे केले असताना भाजपबाबत मात्र मित्रत्वाची भूमिका घेतली आहे. यामुळे जेथे भाजपचे उमेदवार उभे असतील तेथे त्यांना धडा शिकवण्याच्या विचारात शिवसैनिक असल्याचे चित्र आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.