आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नरेंद्र मोदींच्या फतव्याने राज्य भाजपची बैठक रद्द

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - संसदेच्या अधिवेशनाच्या शेवटच्या टप्प्यात भाजपच्या प्रत्येक खासदाराने हजेरी लावलीच पाहिजे, असा अादेश पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी काढला अाहे. बहुचर्चित भूसंपादन विधेयक लोकसभेत मांडले गेल्यास बहुमत घेणे सोपे जावे यासाठी भाजपच्या खासदारांना दिल्लीतच थांबण्याच्या सूचना केंद्रीय नेतृत्वाकडून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे मेपासून काेल्हापुरात होऊ घातलेली भाजप प्रदेश कार्यकारिणीची बैठक पुढे ढकलण्यात आली आहे.
फडणवीस सरकारचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन यशस्वीरीत्या पार पाडल्यानंतर प्रदेश भाजपने केंद्र आणि राज्य सरकारची कामगिरी जनतेपर्यंत पोहोचवण्याची तयारी सुरू केली आहे. याच तयारीबाबत विस्तृत चर्चा करून नियोजन करण्यासाठी कोल्हापूर येथे ते मेदरम्यान भाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक होणार होती. याशिवाय प्रदेश भाजपच्या नव्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा आणि पक्ष आणि सरकारदरम्यान योग्य समन्वय साधण्याबाबतच्या उपाययोजनांवरही या बैठकीत चर्चा केली जाणे अपेक्षित हाेते.

कोल्हापूर येथे हाेणाऱ्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीचे उद््घाटन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या हस्ते होणार होते, तर समारोपाचे भाषण करण्यासाठी केंद्रीय भुपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना निमंत्रित करण्यात आले होते. याशिवाय भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हेदेखील खासदार असल्याने या तिघांनाही दिल्लीत राहणे बंधनकारक असल्याने कार्यकारिणीची बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. संसदेच्या अधिवेशनादरम्यान लोकसभेचे कामकाज मेपर्यंत चालणार असून राज्यसभेचे कामकाज १३ मेपर्यंत चालणार आहे. त्यामुळे आता राज्य कार्यकारिणीची बैठक मे महिन्याच्या अखेरीस होईल, अशी माहिती पक्षाच्या वतीने देण्यात आली आहे.

भूसंपादनावर सावध पवित्रा
सध्यादिल्लीत संसदेचे अधिवेशन सुरू असून अधिवेशनाच्या शेवटच्या टप्प्यात प्रत्येक खासदाराने हजर असावे, अशा सूचना भाजपच्या प्रत्येक खासदाराला देण्यात आल्याची माहिती भाजपमधील सूत्रांनी दिली आहे. सध्यातरी या अधिवेशनात बहुचर्चित असे भूसंपादन विधेयक संसदेत मांडले जाण्याची शक्यता कमी असल्याचा अंदाज तज्ज्ञ वर्तवत अाहेत. मात्र ऐनवेळी हे विधेयक संसदेत मांडायचे झाल्यास लोकसभेत बहुमताचा आकडा गाठणे सहज शक्य व्हावे म्हणूनच भाजपच्या प्रत्येक खासदाराला नियमितपणे संसदेत हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.