आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi In Maharashtra Meet Uddhav Thackeray

गडकरींच्या गैरहजेरीत लोकसभेची रणनीती, मोदींचा आक्रमकतेचा कानमंत्र

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्यातील पक्षाचे दिग्गज नेते नितीन गडकरी यांच्या गैरहजेरीतच गुरुवारी पक्षाच्या लोकसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यात आली. पक्षाच्या निवडणूक प्रचार समितीचे प्रमुख गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रदेश कोअर कमिटीची बैठक घेतली.
काँग्रेसविरुद्ध आक्रमकतेचा कानमंत्र देतानाच आगामी लोकसभा निवडणुकीत युतीसमोर 30 हून जास्त जागा जिंकण्याचे लक्ष्य ठरवण्यात आले. तासाभराच्या भाषणात मोदींनी आगामी निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचे आवाहन नेत्यांना केले.
मनसेचा उल्लेख नाही : शिवसेना-भाजप युतीने निवडणुकीसाठी जोरदार तयारी करावी, असे मोदींनी सांगितले. मनसेबाबतचा प्रश्न विचारला गेला तेव्हा नंतर विचार करता येईल, असे सांगून मोदींनी बोलणे टाळले.

उत्तराखंडात गुजराती लोकांचा बचाव केल्यावरून शिवसेनेने आधी मोदींवर टीका व नंतर सारवासारव केली होती. या पार्श्वभूमीवर मोदी यांनी ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. निवडणुकांना एकदिलाने सामोरे जाण्याचे आवाहन त्यांनी केले. त्यावर उद्धव यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे राज ठाकरे यांच्या मनसेने युतीत येण्याचा काही दिवसांपासूनचा विषय तूर्त बाजूला पडल्याचे मानले जात आहे. मनसेने युतीत यावे यासाठी भाजपने चालवलेल्या प्रयत्नांबद्दल शिवसेनेमध्ये प्रचंड नाराजी होती.

नेत्यांना सल्ला; हे करा, हे नको
मतदार याद्या अद्ययावत करून घ्या
सर्व थरांतील मतदारांत ऊठबस करा
सरकारचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणा
निवडणुकीच्या तोंडावर रथयात्रा नको
भ्रष्टाचाराच्या बाबतीत हवेत बार नकोत
कोणावरही निराधार आरोप करू नका

गडकरी दिल्लीत : मोदींच्या पहिल्याच बैठकीस गडकरी का नव्हते, असा प्रश्न अनेकांना पडला. 29 जूनला नॉर्वेला जाणार असल्याने व्हिसाच्या मुलाखतीसाठी ते दिल्लीत असल्याचे समजले. तथापि, रात्री मुंबईत एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात ते मोदींसोबत उपस्थित होते.