आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नरेंद्र मोदींच्या गुजरातमध्ये शिवरायांचा चुकीचा इतिहास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास चुकीचा शिकवला जात असल्याचे उघडकीस आल्याने राज्यातील शिवभक्तांमध्ये संतापाची लाट आहे. याच मुद्दय़ावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीने भाजप आणि शिवसेनेला कोंडीत पकडले आहे. यामुळे पंचाईत झालेल्या या दोन्ही पक्षांनी या मुद्दय़ावर मौनच बाळगणे पसंत केले.

गुजरात सरकारच्या पाठय़पुस्तक निर्मिती मंडळाने सातवीच्या पुस्तकात दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे आजोबा होते, असा खोडसाळ आणि संतापजनक उल्लेख केला आहे. एवढेच नव्हे तर महाराजांची जन्मतारीख ही चुकीची प्रसिद्ध केली आहे. मोदी हे स्वत: ही वेळोवेळी चुकीचे ऐतिहासिक दाखले दिल्याबद्दल अडचणीत आलेच आहेत. आता त्यांच्या सरकारतर्फे असा चुकीचा इतिहास शिकवला जात असल्याबद्दल शिवप्रेमींनी संताप तर काँग्रेस-राष्ट्रवादीने टीका केली आहे.

शिवसेनेने उत्तर द्यावे: ‘मोदी हे नेहमी चुकीचा इतिहास सांगत फिरत असतात. मोदींचा या इतिहासामागील गंगोत्री काय आहे, अशी शंका आम्हाला नेहमी पडायची. आता आम्हाला त्याचे उत्तर सापडले आहे. मोदींच्या राज्यात पाठय़पुस्तकेच चुकीचा इतिहास शिकवला जातोय, यामुळेच मोदींचा इतिहास कच्चा असेल. शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राजकारण करणार्‍या शिवसेनेला आता काय म्हणायचे आहे,’ असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे.

मुख्यमंत्र्यांचाच इतिहास कच्चा :‘दादोजी कोंडदेवांना शिवरायांचे आजोबा म्हणणे हा द्रोह आहे. मात्र त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचाच इतिहास कच्चा असल्यावर इतरांकडून काय अपेक्षा ठेवणार? गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे आजवर जाहीर सभांमधून खोटे बोलत होते, आता तर त्यांच्या शाळांमधूनही खोटा इतिहास शिकवायला निघाले आहेत,’ अशी टीका राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी केली.

छत्रपती संभाजीराजेंनी पाठवले पत्र
शिवाजी महाराजांचे वंशज असलेले छत्रपती संभाजीराजे यांनी या प्रकाराबद्दल संतप्त होऊन थेट नरेंद्र मोदी यांना निषेधाचे पत्रच पाठवले आहे. ‘ही चूक हेतूपुपरस्सरपणे झाली असेल असे आम्हाला म्हणायचे नाही. मोदींनी हे केले असेल, अशीही आमची भूमिका नाही. मात्र ही चूक तत्काळ दुरुस्त करावी आणि तमाम शिवभक्तांची मोदी आणि गुजरात सरकारने माफी मागावी,’ अशी भूमिका संभाजीराजे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना मांडली. संभाजीराजे हे महाराष्ट्र सरकारलाही एक पत्र पाठवून या प्रकरणी गुजरात सरकारकडे पाठपुरावा करण्याची विनंती करणार आहेत.

ही तर जेम्स लेन प्रवृत्ती : खेडेकर
मराठा सेवा संघाचे प्रमुख पुरुषोत्तम खेडेकर यांनी या प्रकाराचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला. ‘दादोजी कोंडदेव यांना शिवरायांचे गुरू म्हटले जात होते, तोवर आम्ही विरोध केला नाही. मात्र जेम्स लेनसारख्यांनी कोंडदेवला थेट शिवरायांचे पिता दाखवण्याचा विकृत प्रयत्न केला तेव्हा मात्र आम्ही त्याचा विरोध केला. बहुधा महाराष्ट्रात या जेम्स लेन प्रवृत्तीच्या लोकांना काही करता येत नसल्याने गुजरातेत ते आपले विकृत मनोरथ तडीस नेत असतील. मात्र हा प्रकार म्हणजे राष्ट्राचा अपमान आहे,’ अशी टीका खेडेकर यांनी केली.