आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नरेंद्र मोदी अखेर वठणीवर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वाराणसी येथे शिवसेना उमेदवार उभा करणार असल्याच्या नुसत्या चर्चेवरूनच भाजपची गाळण उडाली होती. नंतर शिवसेनेने उमेदवार देणार नसल्याचे जाहीर केल्याने या मित्रपक्षांतील तणाव काहीसा निवळला आहे. या पार्श्वभूमीवर मोदी यांनी सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर सविस्तर चर्चा केल्याचे समजते.

महाराष्ट्रातील प्रचारात मोदी शिवसेनेला गृहीत धरत नसल्यामुळे उद्धव ठाकरे नाराज आहेत. त्यामुळेच त्यांनी वाराणसीत उमेदवार उभा करण्याची पुडी सोडून भाजपला वठणीवर आणल्याचे सांगितले जाते.

सूत्रांच्या माहितीनुसार, वाराणसीत उमेदवार देणार नसल्याचे उद्धव सांगत असले तरी तेथील नेते मात्र उमेदवारीवर ठाम आहेत. असे झाल्यास, हिंदू मतांचे विभाजन होऊ शकते. त्यामुळे तेथील नेत्यांना समजवावे, यासाठी मोदींनी उद्धव यांना साकडे घातले. त्यावर मोदींविरोधात उमेदवार देणार नसल्याचा उद्धव यांनी पुनरुच्चार केल्याचे सांगितले जाते.

संयुक्त प्रचाराबाबत चर्चा
शिवसेनेतील नेत्यांच्या मते, आमचा पक्ष देशभरात आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करीत आहे. उत्तर प्रदेशमध्येही आम्ही लोकसभेसाठी उमेदवार उभे करीत आहोत. मोदी यांनी महाराष्ट्रातील राजकीय स्थितीबाबत उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. निवडणूक जवळ येत असल्याने राज्यातील राजकीय परिस्थिती काय आहे, राष्ट्रवादी-काँग्रेस यांची सद्य:स्थिती, मतदारांच्या कला याबाबत दोघांमध्ये चर्चा झाली. तसेच मोदी यांची मुंबईत सभा आयोजित करण्याबाबतही या दोघांमध्ये चर्चा झाल्याचेही शिवसेनेतील सूत्रांनी सांगितले.