आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi News In Marathi, BJP, Lok Sabha Election, Congress, Priyanka Gandhi

नरेंद्र मोदींना रोखण्यासाठी अखेरच्या टप्प्यात प्रियंकास्त्र वापरले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - वरिष्ठ नेत्यांना खड्यासारखे बाजूला केल्याचा आरोप भाजपवर काँग्रेस करीत असतानाच काँग्रेसनेच वरिष्ठांना बाजूला केल्याने पक्षाला प्रचारात मार खावा लागला, अशी चर्चा आता काँग्रेसमध्येच रंगू लागली आहे. ही चूक लक्षात आल्यानंतर अखेर वरिष्ठांनाच शरण जाण्याची वेळ तरुण तुर्कांवर आली आणि त्यानंतर वरिष्ठांनी प्रियंकास्त्र प्रभावीपणे वापरण्याचा सल्ला दिल्याचे कळते.

काँग्रेसमध्ये तरुण आणि वरिष्ठ असे दोन गट पडल्याचा फटका काँग्रेसला बसत असल्याचेही एका ज्येष्ठ मंत्र्याने नाव गुप्त राखण्याच्या अटीवर सांगितले.भाजपच्या नरेंद्र मोदी यांना रोखण्यासाठी काँग्रेसला प्रचंड कष्ट घ्यावे लागत असल्याचे चित्र प्रचारादरम्यान दिसून आले. राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांचा प्रचारात जराही प्रभाव दिसला नाही. मात्र, गेल्या काही दिवसांपासून प्रियंका गांधी मैदानात उतरल्या आणि त्यांनी नरेंद्र मोदी यांना तोडीस तोड उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रियंका गांधी यांच्या प्रचारामुळे शेवटच्या टप्प्यात काँग्रेसमध्ये जान आल्याचे चित्र दिसत आहे.

याबाबत ‘दिव्य मराठी’शी बोलताना काँग्रेसच्या एका वरिष्ठ मंत्र्याने सांगितले की, आमची सुरुवातच चुकली. नरेंद्र मोदी यांनी जेव्हा प्रचारास सुरुवात केली तेव्हा केंद्रीय पातळीवरून प्रचाराचा ‘प्र’ अक्षरही उच्चारला जात नव्हता. प्रचाराला सामोरे जाताना एक चेहरा हवा असतो तो चेहरा समोर आणण्यातही काँग्रेसने उशीर केला. राहुल गांधी यांची जेव्हा निवड झाली तेव्हा नरेंद्र मोदी यांनी प्रचाराचा अर्धा हिस्सा पूर्ण केला होता.

नरेंद्र मोदी यांचा झंझावात रोखणे त्यामुळेच कठीण झाले. यातच अहमद पटेल यांच्यासारख्या अनेक नेत्यांना बाजूला सारल्याने पक्षात सरळ-सरळ दोन गट निर्माण झाले होते. खरे तर वरिष्ठ नेत्यांचा योग्यरीत्या उपयोग करून घेण्यात राहुल गांधी अयशस्वी ठरले, असेही या मंत्र्याने सांगितले. एक प्रकारे काँग्रेस मोदींचा समाना करण्यास सक्षम ठरू शकली नाही.

तथाकथितांच्या हाती धुरा ?
काँग्रेस प्रचारात मागे का पडली? असे विचारता या मंत्र्याने सांगितले की, राहुल गांधी आणि त्यांच्या भोवतीच्या तथाकथित तरुण नेत्यांच्या हातात प्रचाराची धुरा गेल्याचा फटका काँग्रेसला बसला आहे. केंद्र सरकारने घेतलेले निर्णय जनतेपर्यंत पोहोचवण्यात आम्ही कमी पडलो. खरे तर काँग्रेस नेतृत्वाने याचा गंभीरतेने विचार करावयास हवा होता. परंतु तसे न करता नरेंद्र मोदी यांचा झंझावात रोखण्यासाठी तरुण पिढीने केंद्र सरकारच्या योजनांवर बोलण्याऐवजी नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बोलून त्यांचाच प्रचार केला. वरिष्ठ नेत्यांशी सल्ला-मसलत केली नाही.

तरुण नेत्यांची वरिष्ठांकडे धाव
स्थिती हाताबाहेर गेल्यानंतर मात्र तरुण नेत्यांनी वरिष्ठ नेत्यांकडेच धाव घेतली, असे सांगून हा मंत्री म्हणाला, प्रियंका गांधी अगोदरही सभा घेत होत्या परंतु त्याची चर्चा होत नव्हती. वरिष्ठ नेत्यांनी लगेचच रणनीती आखून प्रियंकाच्या सभांकडे माध्यमांना वळवले, त्याचा परिणाम तुम्ही पहातच आहात. आज प्रियंका या नरेंद्र मोदी यांना तोडीस तोड उत्तर देत आहेत आणि माध्यमात त्याची चर्चाही होत आहे. याचा काँग्रेसला काही प्रमाणात फायदा होणार आहे. तरुण नेत्यांनी अगोदरच वरिष्ठ नेत्यांची मदत घेतली असती तर वेगळे चित्र दिसले असते, असेही या मंत्र्याने सांगितले.